अगोदरच सरकार स्थापन करण्यास वेळ, सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तारात घोळ आणि आता खातेवाटपावरून रस्सीखेच हे काही बरोबर नाही. जनतेची कामे अगोदर हाती घ्या, असे सांगत आपण मंत्रिपदासाठी इच्छुक होतो, पण संधी दिली नाही म्हणून नाराज नाही असे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी शनिवारी विटा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.

आ. बाबर यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असे दिसत असतानाच त्यांची संधी हुकली. यावरून कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून याचे पडसाद समाजमाध्यमातून नेत्यांवर टीकाटिपणी होत आहे. या संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

ज्येष्ठ सदस्य म्हणून संधी मिळायला हवी होती, त्यासाठी इच्छुकही होतो, मात्र मंत्रिमंडळात समावेश झाला नाही म्हणून मी जनतेची कामे थांबविणार आहे, अथवा वरिष्ठ नेत्यांबाबत आकस आहे असे  नाही, असे सांगून आ. बाबर म्हणाले की, मतदारसंघातील अनेक समस्या आहेत, यामध्ये टेंभू योजनेच्या कामाला गती देणे, अवकाळीने  नुकसान झालेल्यांचे प्रश्न सोडविणे, ही कामे तर प्राधान्याने हाती घ्यावी लागतीलच, पण त्याचबरोबर सामान्य माणसांना न्याय देण्यासाठी मंत्रिपदच हवे असे नाही, आमदार म्हणूनही काम करता येते. मंत्रिपदासाठी आपण कार्यकर्त्यांच्या गाडय़ा भरून शिष्टमंडळ नेले नाही.

ते म्हणाले की, मंत्रिपदाची संधी मिळाली नाही या कारणामुळे कार्यकत्रे समाजमाध्यमावर रोष व्यक्त करीत आहेत, पण ते चुकीचे आहे, माझे मंत्रिपद कोणीही कापले  नाही. ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करीत राहणार असून कार्यकर्त्यांनी सबुरीने घेतले पाहिजे.

या वेळी आटपाडीचे तानाजी पाटील यांनी आ. बाबर यांना मंत्रिपदाची संधी मिळायला हवी होती, कामाच्या माणसापेक्षा तुरुंगात जाऊन आलेले, भूखंड लाटल्याचे आरोप असणारे मंत्रिमंडळात आहेत. या तुलनेत आ. बाबर हे कितीतरी उजवे असताना त्यांना डावलले ही आम्हा कार्यकर्त्यांना जिव्हारी लागणारी बाब असल्याचे सांगितले.

अवकाळीच्या नुकसानीकडे दुर्लक्ष

या वर्षी अवकाळीने पिकांचे प्रचंड  नुकसान झाले आहे, याकडे पाहण्याची गरज आहे, मात्र अगोदरच सरकार स्थापन करणे, मंत्रिमंडळ विस्तार आणि आता खात्यांसाठी सुरू असलेली रस्सीखेच अयोग्य असून मिळेल ती जबाबदारी यशस्वीपणे हाताळणे गरजेचे आहे.

– आमदार अनिल बाबर