किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवजन्म सोहळा पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जगापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर राजकीय टोलेबाजी करत उपस्थितांना पोट धरून हसायला लावलं. छत्रपतींना येणाऱ्या भाषांचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या मनातील गोष्टी ओळखण्यासाठी नवीन भाषा शिकणार असल्याचं सांगताच हास्याचे कारंजे उडाले.
आणखी वाचा- संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मसोहळा कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपतींना अवगत असलेल्या भाषांचाही भाषणात उल्लेख केला. “शिवयोग हा एक नवीन शब्द आहे. त्याचबरोबर शिवसुमन हे फुल. हे फुल आधी बघितलं नव्हतं अशातला भाग नाही. पण, त्याच वैशिष्ट्ये आज कळालं. ते फुल शिवनेरी परिसरातच पहिल्यांदा आढळून आलं, हा शिवयोग आहे. ज्यांनी ते शोधलं, त्याचं वेगळेपण ओळखलं त्यांचं मी कौतूक करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा यायच्या याबद्दल आता बोलत असताना अतुलजी मला सांगत होते. त्यात एक भाषा होती, इंगित विद्याशास्त्र. ही भाषा दादांना (अजित पवार) येते. पण, आता मी ती भाषा शिकणार आहे. का? तर दादांच्या मनात काय चाललंय ते कळलं पाहिजे. भाषा शिकतो आणि मग दादांनी मास्क लावू द्या, गॉगल घालू द्या, तरीही ओळखून दाखवेन की, दादांच्या मनात काय चाललंय,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना पोट धरून हसायला लावलं.
आणखी वाचा- लॉकडाउन वाढवायचे अधिकार कोणाला?; अजित पवारांनी केलं स्पष्ट
“काही गोष्टी अशा असतात की त्याला भाषेची गरज नसते. एखादी गोष्ट करायची ठरवली की, बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. त्या एका जिद्दीने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मी असेन, दादा असतील किंवा संभाजीराजे असतील. राजे तुम्ही कितीही म्हणा राजकारण बाजूला ठेवा… पण तुमच्या आमच्या मनातील शिवप्रेम हा धागा आहे ना, महत्त्वाचा आहे. धागे अनेक असतात, पण गोफ विणणे महत्त्वाचं असतं. हा गौफ राज्याच्या विकासाचा गौफ असणार आहे. अनेक किल्ले मी हेलिकॉप्टरमधून बघितले आहेत. हे जगापर्यंत पोहोचवायचं आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 11:54 am