काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शिवसेनेकडून खुलासा करण्यात आला आहे. शिवसेना नेते अनिल परब यांनी आपल्याला यासंबंधी कोणतीही कल्पना नसल्याचं सांगितलं आहे. “पृथ्वीराज चव्हाण यांना हा प्रस्ताव कोणी आणि कधी दिला हे माहिती नाही. हा प्रस्ताव देताना चर्चेसाठी कोण उपस्थित होतं त्यांची नावं उघड केली जावीत. याबद्दल पृथ्वीराज चव्हाणच जास्त माहिती देऊ शकतात,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘पाच वर्षांपूर्वीच शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव’

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले ?
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत विरोधी विचारसरणी असतानाही शिवसेनेशी आघाडी करावी, असे काँग्रेसला का वाटले? असे विचारता, चव्हाण यांनी २०१४ मधील राजकीय स्थितीचा दाखल दिला. भाजपाला रोखण्यासाठी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याकडे संपर्क साधला. मात्र, मी तातडीने हा प्रस्ताव फेटाळला. राजकारणात जय-पराजय असतातच, आम्ही निवडणूक हरल्याने विरोधात बसणार हे त्यावेळी स्पष्ट केले होते. आताही शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्यास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली, असे चव्हाण यांनी सांगितले.

आणखी वाचा – पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड – देवेंद्र फडणवीस

“शिवसेनेचा खरा चेहरा उघड”
देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी बोलताना सांगितलं की, “अत्यंत आश्चर्यकारक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने हे वक्तव्य केल्याने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. यामधून शिवसेनेचा खरा चेहरा उघड होतो आहे. विचारधारा, तत्वं, मूल्य अशा काहीच गोष्टी नाहीत का ? सत्ता हेच त्यांच्यासाठी सगळं आहे का ? एकदा शिवसेनेने खुलासा केला पाहिजे”.

आणखी वाचा – २०१४ मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसलाही दिला होता प्रस्ताव? नवाब मलिक यांनी केलं स्पष्ट

“राष्ट्रवादी काँग्रेसला असा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही”
“शिवसेनेचं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बोलणं झालं असेल पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नव्हतं. काँग्रेस एक वेगळा पक्ष आहे. त्यांना प्रस्ताव आला असावा. पण निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला असा कोणताही प्रस्ताव आला नव्हता,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.