शिवसेनेने आज पीक विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला होता. त्यावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. आता विमा कंपनीसुद्धा शिवसेनेचं ऐकत नाही. म्हणून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना त्याविरोधात आंदोलन करावं लागतयं.

मुंबईच्या भाषेत सांगायच झालं तर शिवसेना एवढी लुक्खी झालीय कि विमा कंपनी सुद्धा त्यांच ऐकत नाही अशा शब्दात त्यांनी शिवसेनेच्या मोर्चावर टीका केली. शिवसेना सत्तेमध्ये असलेला पक्ष आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बसून हा विषय सोडवायला हवा होता. मोर्चा काढायचा होता तर वर्षावर काढायला हवा होता अशी निलेश राणे यांनी टीका केली.
शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे विमा कंपनीकडून वेळेवर मिळत नसल्या कारणाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडक मोर्चा काढण्यात आला होता.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
राज्यातील सर्व विमा कंपन्या आणि बँकांना मी हात जोडून विनंती करतो की, आम्हाला आक्रमक व्हायला लावून का. ज्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला आहे तसेच ज्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे, त्यांच्या नावांची यादी या कंपन्यांनी आणि बँकांनी पंधरा दिवसांत आपल्या कार्यालयाच्या दरवाजावर लावावीत, अन्यथा हा मोर्चाच बोलेल अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना इशारा दिला आहे. बीकेसीत शिवसेनेच्या पीकविमा मोर्चाची सांगता झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रावेळी मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही बांधील आहोत. आम्ही ज्यांचे अन्न खातो त्यांच्याशी कधीही गद्दारी करणार नाही, त्यामुळेच या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेने मुंबईत हा धडक मोर्चा काढला आहे. जी व्यक्ती माणूस म्हणून जगतेय त्यांचा हा मुद्दा आहे, याला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, अशा शब्दांत त्यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली.