News Flash

ताणलेले नाट्य संपले; कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने सोमवारपासून सुरू!

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली परवानगी ; व्यापाऱ्यांच्या सामुहिक लढ्याला यश

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्ण व मृत्यू दर वाढल्याने व्यवहारावर निर्बंध घातले होते. (संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने सुरु होण्याबाबतचे ताणलेले नाट्य अखेर शनिवारी सायंकाळी संपले. सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने सुरु करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्ण व मृत्यू दर वाढल्याने व्यवहारावर निर्बंध घातले होते. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर जिल्हा करोना नियमावलीच्या तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर दुकाने सुरू होऊ शकतील. तसे प्रयत्न सुरू आहेत, वरिष्ठ अधिकारी बैठक घेवून याबाबतची भूमिका जाहीर करतील, असे जाहीर केले होते. यामुळे दुकाने उघडण्याच्या आशा बळावल्या होत्या. तर, टोपे यांच्या भेटीनंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यापार सुरू होतील असा दावा केला होता.

व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश

यामुळे जिल्ह्यातील दुकाने चालू होणार की नाही याची प्रतीक्षा असताना आज जिल्हाधिकारी रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना या शनिवार व रविवार बंद राहतील, असा आदेश काढला. व्यापारी वर्गाने त्याचे स्वागत केले. तसेच, व्यापाऱ्यांच्या सामुहिक लढ्याला यश आल्याचे म्हटले आहे.

शंभर दिवसांच्या बंद नंतर आनंद –

वर्षभराच्या कालखंडात दुसर्‍यांदा शंभर दिवसांची टाळेबंदी जाहीर झाली. हा कालखंड व्यापार्‍यांसाठी अत्यंत कठीण व खडतर होता. आता व्यापार सुरू करता येईल याचा विशेष आनंद असुन, व्यापार्‍यांनी संघटीतपणे लढ्याला साथ दिली व तीव्र संघर्षानंतर मिळालेले यश अधिक उल्लेखनीय असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

या लढ्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते,आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर जिल्हा प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले. या सर्वांना धन्यवाद देत असल्याचे सांगुन गांधी यांनी व्यापार्‍यांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले. दुकानाच्या वेळा वाढवण्यासाठी यापुढे प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.

“कोल्हापुरातील करोना परिस्थिती गंभीरचं आहे” असं सांगत आरोग्यमंत्री टोपेंनी केंद्रीय पथकाचा मुद्दा फेटाळला!

काय सुरु काय बंद …..

– मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह बंद राहतील.
– सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलिंग सर्व दिवशी सकाळी पाच ते सकाळी नऊ पर्यंत सुरू राहतील.
– सर्व प्रकारचे खेळ सर्व दिवशी सकाळी पाच ते सकाळी नऊ पर्यंत खुल्या मैदानात परवानगी असेल.
– सर्व सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक कार्यक्रम आणि मेळावे बंद राहतील.
– लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त २५ लोकांच्या उपस्थितीत परवानगी
– अंतयात्रा, अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस लोकांना परवानगी
– स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सभा, बैठका, निवडणुका यासाठी सभागृहाच्या 50% बैठक क्षमतेपर्यंत मर्यादित राहतील
– व्यायामशाळा, केशकर्तनालय, दुकाने, ब्यूटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर हे सर्व दिवशी सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत 50% क्षमतेसह सुरू राहतील मात्र या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांनी पूर्वनियोजित वेळ ठरवून तसेच एसी सुरू न करण्याच्या अटीवर सुरू राहतील

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 8:12 pm

Web Title: shops in kolhapur district open from monday msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कोल्हापूर : पंचगंगा नदीत सापडला अमेरिकेत आढळणारा ‘ॲलिगेटर’ मासा
2 “हालचाली तर वाढणारच”; शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांचं ट्वीट!
3 दिल्लीत शरद पवारांच्या गाठीभेटींबाबत नवाब मलिक यांनी दिली माहिती, म्हणाले…