आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी केल्याच्या आरोपावरून औरंगाबाद पोलीसांनी शुक्रवारी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून १९० मोबाईल संच, चार मोटारी आणि सहा लाख रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये नरेश धर्माजी पोतलवाढ, अलोक अशोक आगरवाल, प्रफुल्ल राठी, ललित कोठारी, अनिल मुनोत आणि विनय जैन यांचा समावेश आहे. यापैकी पोतलवाढ हा मुख्य आरोपी असून, त्याच्याच घरामधून आयपीएलच्या सामन्यांवर सट्टेबाजी केली जात होती. उर्वरित सर्व आरोपी व्यापारी असून, त्यांनी वेगवेगळ्या बनावट नावांनी सिमकार्ड विकत घेतले होते. या सर्व सिमकार्डच्या साह्याने मध्यवर्ती यंत्रणा तयार करण्यात आली होती आणि त्यावर वेगवेगळ्या ठिकाणाहून सट्टेबाजीसाठी आलेले फोन घेण्यात येत होते. कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यावेळी सट्टेबाजी सुरू असताना पोलीसांनी छापा टाकून या सर्व आरोपींना अटक केली. गेल्या दीड वर्षांपासून आरोपींकडून सट्टा लावण्यात येत होता, अशी माहिती पोलीसांनी दिली.