अकोला : शेतीच्या वादातून जमिनीच्या मूळ मालकास पेरणी करता येऊ  नये म्हणून आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरपुढे ढकलणाऱ्या मुलगा व नातवावर मालेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे.

वाशीम जिल्हय़ाच्या मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे शेतमालक महादेव लक्ष्मण राऊत यांनी कैलास दळवी यांना पेरणीसाठी जमीन दिली होती. ती जमीन कैलास दळवी यांनी बळकावण्याचा प्रयत्न केल्यावर राऊत तालुका न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली. यामध्ये राऊत यांच्या बाजूने निकाल लागल्याने ते शेतात पेरणी करण्यास गेले असता दळवींनी पेरणी थांबवण्यासाठी स्वत:च्या आईला ट्रॅक्टरखाली ढकलले.

याप्रकरणी सरकारतर्फे  पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पिंपळकर यांनी मालेगाव पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंगळा येथील महिला पार्वता दळवी हिला तिचा मुलगा कैलास दळवी व नातू अंकुश दळवी यांनी शेतीच्या वादावरून ट्रॅक्टरखाली ढकल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अंकुश दळवी याला पोलिसांनी अटक केली आहे.