मत्स्यसंवर्धनातून स्थानिकांना रोजगाराची संधी; पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : वसई-विरार शहरातील नागरिकांना रोजगार संधी आणि मत्स्यसंवर्धनासाठी पालिकेने ५९  तलावांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वसई-विरार शहरातील प्रभागात अनेक छोटे-मोठे तलाव आहेत. त्या तलावांचे राज्य सरकारच्या तलाव संवर्धन योजनेतून पालिकेच्या वतीने सुशोभीकरण केले आहे. त्यापाठोपाठ आता त्या तलावांचा लिलाव करून ते मत्स्यशेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे पालिकेला यातून चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे. कारण वसई-विरारमध्ये मोठय़ा प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय चालतो. अनेक जण शेततळी तयार करून त्यात मत्स्यबीज सोडून मत्स्यसंवर्धन करतात. तर काही जणांना जागा उपलब्ध होत नाही म्हणून मत्स्यसंवर्धन करता येत नाही. पालिकेच्या नऊ  प्रभागांत एकू ण १०४ तलाव आहेत. यातील ५९ तलाव लिलाव करून एक ते तीन वर्षांपर्यंत ठेका पद्धतीने मत्स्यसंवर्धानासाठी दिले जातील. याबाबतची ई निविदासुद्धा पालिकेने पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तलावात खाऱ्या व गोडय़ा पाण्यातील विविध प्रजातींच्या माशांचे संवर्धन मच्छीमारांना करता येणार आहे. परंतु मत्स्यसंवर्धन व जतन करताना पालिकेच्या सुशोभीकरणाला धक्का लावू नये अशा सूचना केल्या आहेत. तलावांची स्वच्छता राखूनच नैसर्गिकरीत्या मत्स्य् संवर्धन करावे असेही पालिकेने सांगितले आहे.

वसई विरार महापालिकेने हळूहळू शहरातील उत्तपन्नाचे स्रेत विकसित  करण्यास सुरवात केली आहे. त्यामध्येच आता पालिकेने पालिका क्षेत्रातील तलाव हे लिलावाद्वारे मत्स्य संवर्धन करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिकांना रोजगाराची संधी

पालिकेने मत्स्यसंवर्धन व जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे येथील स्थानिक मच्छीमारांच्या संघटना व मच्छीमार तरुणांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार आहे. मत्स्यबीज उत्पादन केंद्रातून मत्स्यबीज सहजरीत्या उपलब्ध होते. तर खाडय़ांमध्येही अनेक लहान लहान मासे मासेमारी करताना हाती लागतात. ते मासे जर तलावात सोडून त्यांचे योग्य संवर्धन केले तर स्वयंरोजगाराचे चांगले साधन उभे करता येऊ  शकते.

पालिके तर्फे  नऊ  प्रभागांतील काही तलाव हे मत्स्यसंवर्धानासाठी लिलावाद्वारे दिले जाणार आहेत. यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल व तलावांचेही संवर्धन होईल.

– मयूर साळवे, उद्यान व वृक्षसंवर्धन अधिकारी, पालिका