मालमत्ता व पाणीपट्टीसह गाळा भाडय़ांच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट नगरपालिकेसमोर असून ३१ मार्चपर्यंत १०० टक्के वसुली करून त्याचा अहवाल शासनास सादर करावयाचा असल्याने पालिकेच्या वतीने सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत विशेष वसुली मोहीम राबविली जात आहे.

संबंधित मालमत्ता धारक व थकीत पाणीपट्टीसंदर्भात नळ जोडणीधारकांना देयक देऊनही ज्यांनी ती अद्याप भरली नाहीत, अशा नागरिकांच्या देयकांची रक्कम आता थकबाकीत रूपांतरित झाली आहे. २५ हजारांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची नावे, पत्ता व थकबाकीच्या रकमेसह

यापुढे वर्तमानपत्रांमधून प्रसिद्धी दिली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी दिली. यानंतरही थकबाकी न भरल्यास ती वसूल करण्यासाठी संबंधित मिळकत धारकांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जंगम व स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल. तसेच त्यावर मनमाड नगर परिषदेचे नाव लावण्यात येईल. त्यानंतर अशा मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण व विक्री करता येणार नाही, अशी नोटीस थकबाकीदार मालमत्ताधारकांना देण्यात आली आहे. पालिकेने ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक सुटीच्या दिवशीही शनिवार, रविवारसह वसुली विभाग सुरू ठेवला असल्याची माहिती डॉ. मेनकर, विशेष वसुली पथक प्रमुख सतीश जोशी, कर अधीक्षक संजय पेखळे आदींनी दिली.

थकबाकीदारांची उतरत्या क्रमाने नगरपालिकेने यादी तयार केली आहे. त्यानुसार पुरेशी संधी देऊनही जे थकबाकीदार कर भरत नाहीत. त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. गाळेधारकांच्या गाळ्यांवर थकबाकीची नोटीसही लावण्यात आली आहे.  पालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांकडेही मोठय़ा प्रमाणावर थकबाकी असून त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.