माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पुकारलेल्या लाक्षणिक संपाला जिल्हय़ात चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा जिल्हा समन्वय समितीने केला. बहुतांशी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी सुटीचा आनंद घेतला. जिल्हय़ात एकूण ९१३ शाळा आहेत.
समन्वय समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरली व जोरदार घोषणाही दिल्या. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, सचिव शांताराम डोंगरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष एम. एस. लगड, सचिव अप्पासाहेब शिंदे, शिक्षकेतर सेवक संघाचे अध्यक्ष भागाजी नवले, सचिव भानुदास दळवी, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, सचिव विठ्ठल ढगे, प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे सचिव आर. बी. कुलकर्णी, कला शिक्षक संघाचे अशोक डोळसे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
चिपळूणकर समितीप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करावी, शाळांचे अनुदान पूर्वलक्ष्यी प्रभावाने सहाव्या वेतन आयोगानुसार थकबाकीसह मंजूर करावे, विनाअनुदान धोरण कायमस्वरूपी रद्द करावे, तुकडय़ांचा सुधारित आदेश रद्द करून तुकडय़ांना पूर्वीप्रमाणेच मान्यता द्यावी, आरटीई कायद्याप्रमाणे शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजुरी द्यावी व कला शिक्षकांवरील अन्याय दूर करावा आदी मागण्या आहेत.