आजवर राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या साखरपट्टय़ात भाजपचे नरेंद्र मोदी यांच्या सभांना गर्दी होत असून, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत. राज्यातील ‘शुगर लॉबी’चा प्रभाव कमी झाल्याचेच हे द्योतक. या निवडणुकीत तर ते प्रकर्षांने जाणवत असून, या वेळी सहकारातील मातब्बर घराण्यांनासुद्धा राजकीय अस्तित्वासाठी झुंजावे लागत आहे. या साखरसम्राटांना महायुतीबरोबरच कॉँग्रेस-राष्ट्रवादीनेही फारसे गोंजारले नसून, उलट त्यांच्यामुळे मतदारांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ या निवडणुकीत आघाडीवर आली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत साखर कारखान्यांशी संबंधित कलाप्पा आवाडे, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, राजीव राजळे, संजय पाटील, देवदत्त निकम, संजय मंडलिक, धनंजय महाडिक, प्रतीक पाटील हेच रिंगणात आहेत. गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ हेदेखील कारखान्याशी संबंधित असले, तरी त्यांचे नेतृत्व हे काही साखर लॉबीतून पुढे आलेले नाही. पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचीही ओळख केवळ सहकाराशी संबंधित नाही. त्यामुळे पूर्वीच्या निवडणुकांच्या तुलनेत अत्यंत अल्प प्रतिनिधित्व साखर लॉबीला मिळाले आहे. प्रभाव ओसरल्याने आता कॉँग्रेस राष्ट्रवादीनेही त्यांना उमेदवारी दिलेली नाही.
विशेष म्हणजे कारखान्याविरुद्ध लढणारे राजू शेट्टी, सदाशिव खोत व आपकडून रघुनाथ पाटील िरगणात आहेत. राज्यात माजी खासदार बाळासाहेब विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विनय कोरे, कलप्पा आवाडे, विक्रमसिंग घाडगे, आमदार सारे पाटील, सी. डी. नरके, सदाशिव मंडलिक, डी. वाय. पाटील, पतंगराव कदम, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, यशवंतराव मोहिते, अभयसिंह राजेभोसले, बाळासाहेब देसाई, रामराजे िनबाळकर, अनंतराव थोपटे, अशोक काळे, अंकुश टोपे या घराण्यांची मात्र आजही पकड आहे. कारखान्यांबरोबरच शिक्षण, दूध व अन्य संस्थांमुळे ते टिकून आहे.
सहकार अडचणीत आल्याने शिवाजीराव पाटील, नरसिंग पाटील, श्रीपत शिंदे, प्रसाद तनपुरे, संभाजी पवार, शिवाजीराव नागवडे, कृष्णा डोणगावकर, रामकृष्ण बाबा पाटील, लक्ष्मण पाटील, धनाजी साठे या घराण्यांना आमदारकी व खासदारकीपासून वंचित राहावे लागले आहे. मराठवाडय़ात माजी खासदार बाळासाहेब पवार यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. नाशिकला कै. भाऊसाहेब हिरे, ग्यानदेव दादा देवरे, सहकाराचे नेतृत्व करणारे शिवाजीराव पाटील, शिवाजीराव देशमुख, बिडचे पंडित व अडस्कर, वरपुडकर, निलंगेकर या घराण्यांनाही राजकारणात पूर्वीएवढे वैभव राहिलेले तर नाहीच, पण आता त्यांच्या वारसांना राजकारणात बस्तान बसवता आलेले नाही. मधुकर पिचड, व्यंकय्या पत्की, गोपीनाथ मुंडे, अमरिश पटेल, अरुण गुजराथी, सिदप्पा मेहेत्रे, स्वरूपसिंग नाईक, केशरबाई क्षीरसागर, जयप्रकाश दांडेगावकर, शिवराज पाटील चाकुरकर, अप्पासाहेब काडादी या मराठेतर नेत्यांनी कारखाने उभे केले, पण त्यातील अनेकांना चालवता आले नाही. जे चालू आहेत ते धक्का खात, मात्र त्यांतील काहींचे राजकारण हे प्रभावशाली असून त्यांचा आधारही जातीय अशाच स्वरूपाचा आहे.