रायगड लोकसभेसाठी झालेल्या अत्यंत अटितटीच्या लढतीत शिवसेनेच्या अनंत गीते यांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचा पराभव केला आहे. शेवटच्या फेरीपर्यंत चाललेल्या लढतीत गीते यांना २११० मतांची आघाडी मिळवत सलग सहाव्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला.
मतमोजणीच्या सुरुवातीपासून मतदारसंघात तटकरे आणि गीते यांच्या चुरशीची लढाई होणार हे स्पष्ट झाले होते. पहील्या फेरीत गीते यांना २२८ मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर मात्र तटकरे यांनी गीतेंवर आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले दुसऱ्या फेरी पासून आठव्या फेरीपर्यंत तटकरे आघाडीवर होते. तर मतमोजणीच्या नवव्या फेरीपासून तेराव्या फेरीपर्यंत गीते आघाडीवर होते. मतमोजणीच्या चौदा ते अठराव्या फेरीत तटकरेंनी पुन्हा आघाडी घेतली होती. एकोणीस ते पंचविसव्या फेरीत दोघांमध्ये तर अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सव्वीस, सत्तावीस फेऱ्यांतही दोघांमध्ये काटय़ाची टक्कर पाहायला मिळाली. मात्र अखेरच्या आणि निर्णायक फेरीत गीते यांनी २११० मतांची आघाडी घेत खासदारकीची माळ गळ्यात पाडून घेतली.
मतमोजणी अंती शिवसेनेच्या अनंत गीते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मते, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना ३ लाख ९४ हजार ६८ मते, शेकापच्या रमेश कदम यांना १ लाख २९ हजार ७३० मते पडली. याशिवाय अपक्ष उमेदवार सुनील तटकरे यांना ९८४४ तर मुस्लीम समाजाचे अपक्ष उमेदवार मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी ऊर्फ मोदी यांना ९८१४ मते पडली या दोघांची मते राष्ट्रवादी तटकरे यांच्या पराभवासाठी निर्णायक ठरली.
  दरम्यान सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला संथगतीने सुरुवात झाली होती. पहिल्या फेरीचा निकाल येण्यासाठी जवळजवळ पावणे दोन तास लागले होते. त्यानंतर मात्र नियमितपणे मतदानाचा कल समोर येत गेल्या संध्याकाळी साडेचापर्यंत मतमोजणीच्या २८ फेऱ्या पूर्ण झाल्या. दापोली आणि गुहागर मतदारसंघातील प्रत्येकी एक ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतमोजणी काही काळ खोळंबली होती. यानंतर तंत्रज्ञांच्या मदतीने एका मतपेटीतील मतदान आकडेवारी मिळवण्यात यश आले. मात्र दुसऱ्या पेटीतील मतदान आकडेवारी स्पष्ट होऊ न शकल्याने त्या पेटीतील मते नियमानुसार बाद करण्यात आली.  
नोटाही जोरात चालला
रायगडात गीते, तटकरे आणि कदमांपाठोपाठ नोटाही जोरात चालल्याचे दिसून आले. प्रस्तापित राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांवर असलेला राग मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे दिसून आले. रायगड मतदारसंघात २० हजार ३५१ मतदारांनी मतदानाचा नकाराधिकार वापरल्याचे समोर आले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना याची गंभीर दखल घ्यावी लागणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
 आपचा फुसका बार
भारतील पोलीस सेवेतून राजीनामा दिलेल्या पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून आपने उमेदवारी दिली होती. रायगडात पोलीस सेवेत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असल्याने ते चांगली मते घेतील अशी अपेक्षा होती. शिवाय सामाजिक संघटनाच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, मात्र मतदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पुरते नाकारल्याचे दिसून आले. अपरांती यांना केवळ ६ हजार ७५९ मते मिळाली.

तटकरेंनी पराभव स्वीकारला
रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारया राज्याच्या जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. देशात सर्वत्र मोदींची लाट असतानाही रायगडात ही लाट थोपवण्यात मला यश आले होते. मात्र अखेरच्या क्षणी निर्णायक आघाडी घेण्यात आपण कमी पडलो अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. मात्र पराभवामुळे खचून न जाता उद्यापासून जोमाने कामाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. रायगडच्या मतदारांनी भरभरून मते दिल्याबद्दल त्यांनी आभार मनले.
गीतेंच्या विजयामुळे शिवसेनेत जल्लोश
अनंत गीते यांच्या विजयामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. स्वबळावर मतदारसंघात चार लाख मत मिळू शकतात हे यावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी फटाके आणि ढोलताशे वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोश साजरा केला.