सिंचन अनुशेषातील कामांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पत्रामुळे उठविण्यात आल्याने हिंगोली जिल्ह्यातील ६३ सिंचनाची कामे आता सुरू  होणार आहेत. वित्त व नियोजन विभागाला राज्यापालांनी पत्र दिल्यामुळे या कामाला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या कामांना मंजुरी दिल्यानंतर ४ मे रोजी पुन्हा स्थगिती आदेश बजावले होते. ते आता उठविण्यात आले आहेत.

मराठवाडय़ात हिंगोली जिल्ह्याचा सिंचन कामातील अनुशेष बाकी होता. तो कमी व्हावा म्हणून आमदार मुटकुळे यांनी प्रयत्न केले होते. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे त्यांनी अनुशेष दूर करण्यासाठी पाठपुरावा केला. विविध ६३ कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर वित्त आणि  नियोजन विभागाने या कामांना स्थगिती दिली होती.

राज्यपाल यांच्या २०१९ —२०, व २०२०— २१ यावर्षी कार्यक्रमाअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांना देण्यात आलेल्या स्थगिती उठवण्यात यावी असे पत्र राज्याच्या नियोजन व वित्त विभागाला भगतसिंग कोश्यारी यांनी दिले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने जलसंधारण आयुक्तांनाही स्थगिती उठविण्याचे कळविण्यात आले आहे.