औरंगाबाद : शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या मोटारीला हात लावल्याच्या कारणावरून शिक्षिकेने पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीस बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी  दुपारी एकच्या सुमारास ज्युबिली पार्क परिसरातील मॉडेल हायस्कूल येथे घडली. हा सर्व प्रकार शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असल्याचे बेगमपुरा पोलिसांनी सांगितले.

मंजूरपुरा भागात राहणारी ११ वर्षीय मुलगी मिर्झा जरीन बेग ही मॉडेल हायस्कूलमध्ये पाचवीमध्ये शिकते. सोमवारी दुपारी जेवणाच्या सुटीनंतर मुले-मुली शाळेच्या मदानात खेळत होती. त्या वेळी फरहत नावाच्या शिक्षिकेच्या मोटारीला मिर्झा जरीन बेग हिचा हात लागला. त्यामुळे मोटारीला बसविण्यात आलेला सिक्युरिटी अलार्म वाजू लागला होता. हा प्रकार लक्षात आल्यावर शिक्षिका फरहत यांनी मिर्झा जरीन बेगला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिला मुख्याध्यापिका शेख कौसर यांच्या केबीनमध्ये नेऊन आरडा-ओरड करीत पुन्हा एकदा मारहाण करण्यास सुरुवात केली.

भेदरलेल्या अवस्थेत मिर्झा जरीन बेग घरी परत आल्यावर तिचे वडील मिर्झा रशीद बेग यांनी काय झाले अशी विचारणा केली. त्या वेळी मुलीने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर मिर्झा रशीद बेग यांनी मुलीला घेऊन बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून मारहाण करणाऱ्या फरहत नावाच्या शिक्षिकेविरुद्ध तक्रार दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.