उत्तरेकडील वाऱ्यांचा राज्यात परिणाम

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढणार असल्याने त्या भागातून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागात पुढील आठवडय़ात गारठा वाढण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये राज्याच्या बहुतांश भागामध्ये थंडीचा कडाका वाढला होता. पुणे, नागपूर, नाशिक, नगर, औरंगाबाद आदी भागांमध्ये गेल्या कित्येक वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट आली होती. कोकण आणि मुंबई परिसर वगळता इतर सर्व ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. नव्या वर्षांची सुरुवातही थंडीच्या कडाक्याने झाली. त्यानंतर मात्र किमान आणि कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होत गेल्याने थंडीचा कडाका काहीसा कमी झाला.

पुढील आठवडय़ामध्ये काश्मीर, पंजाब, हरियाणासह कर्नाटक, केरळ, तमिळनाडूमध्येही थंडीचा कडाका वाढणार आहे. परिणामी राज्यातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा त्याचप्रमाणे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढतो आहे. वाऱ्याची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे राहणार असल्याने राज्यातील गारठा वाढण्यास पोषक स्थिती आहे. राज्यात शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घटले. उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. शनिवारी राज्यातील नीचांकी तापमान नगर येथे ८.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई  (कुलाबा) १९.०, सांताक्रुझ १५.२,रत्नागिरी १६.४, पुणे ९.१, जळगाव ९.६, कोल्हापूर १४.६, महाबळेश्वर १४.५, मालेगाव ११.८, नाशिक ९.४, सांगली ११.१, सातारा १०.६, सोलापूर १६.५,औरंगाबाद ११.०, परभणी १२.९, नांदेड  १३.५, अकोला १४.१, अमरावती १३.०, बुलडाणा १४.०, ब्रह्मपुरी १०.३,चंद्रपूर १४.२, गोंदिया १०.४, नागपूर   ८.६,वाशिम १५.०,वर्धा ११.९, यवतमाळ १५.४.