वाडा तालुक्यातील ३०० शिक्षकांची दहा दिवसांची रजा फेटाळली

रमेश पाटील, वाडा

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या निमित्ताने दहा दिवसांची पगारी रजा घेऊन गोवा पर्यटनाचे बेत आखणाऱ्या वाडा तालुक्यातील शिक्षकांचा शिक्षण विभागाच्या आदेशाने हिरमोड झाला. गुरुवारपासून (७ फेब्रुवारी) होणाऱ्या या अधिवेशनासाठी तालुक्यातील तीनशेहून अधिक शिक्षकांनी ४ फेब्रुवारीपासूनच सुट्टी घेतली होती. मात्र, अधिवेशनासाठी तीनच दिवस रजा मिळेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शिक्षक नेते व माजी आमदार शिवाजीराव पाटीलप्रणीत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे दिनांक ७, ८ व ९ फेब्रुवारी असे तीन दिवस शिक्षकांचे विशेष अधिवेशन पणजी येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला जाण्यासाठी वाडा तालुक्यातील ३०८ शिक्षकांनी पगारी रजेसाठी अर्ज केले होते. सोमवारपासूनच जिल्हा परिषदेच्या ८० टक्के शाळांना कुलूप लावून शिक्षकवर्ग सुट्टीवर गेला होता. मात्र, शालेय शिक्षण विभागाने ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यानच रजा मिळेल, असे स्पष्ट करत शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अधिवेशनासाठी घेतलेल्या रजेदरम्यान विद्यार्थ्यांचा बुडालेला अभ्यास दररोज किंवा रविवारी जादा वर्ग घेऊन पूर्ण करावा, असे आदेशही शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता निम्म्याहून अधिक शिक्षकांनी गोव्याला जाण्याचा बेत रद्द करत बुधवारपासून शाळा भरवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, शिक्षक अधिवेशनाचे अधिकृत पत्र अद्याप मिळाले नसल्याचे वाडय़ाचे गटशिक्षणाधिकारी जयवंत खोत यांनी सांगितले. तालुक्यातील केंद्र प्रमुखांना सूचना देऊन तालुक्यातील किती शाळा सोमवारपासून बंद होत्या व किती शिक्षक सुट्टीवर गेले आहेत, याची माहिती मागवल्याचेही त्यांनी सांगितले.

संघटनेकडून फसवणूक? या अधिवेशनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणतीही विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याच्या आधीच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिक्षक नेत्यांनी शाळांमध्ये जाऊन अधिवेशनासाठी शिक्षकांना दहा दिवसांची रजा मिळणार असल्याचे सांगितले होते. तसेच अधिवेशनासाठी शिक्षकांकडून निधीही गोळा केला होता. संघटनेच्या निधीच्या पावत्या फाडलेले शिक्षक सोमवारपासून सुट्टीवर गेले. परंतु, शालेय शिक्षण विभागाच्या आदेशामुळे त्यांना पुन्हा कामावर परतावे लागले. अधिवेशनाच्या नावाने निधी दिला आणि आता रजेतही कपात झाली. यामुळे या संघटनेकडून फसवणूक झाल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारने ४ ते १३ व राज्य सरकारने ७ ते ९ या कालावधीत शिक्षकांच्या अधिवेशनाला परवानगी दिली असून तालुक्यातून सुमारे २७५ ते ३००च्या आसपास शिक्षक अधिवेशनाला गेले आहेत.

– प्रदीप पाटील, अध्यक्ष-अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, वाडा तालुका.