कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. 60 वर्षांचे हे वृद्ध गृहस्थ इचलकरंजी येथील रहिवाशी होते. त्यांच्यावर येथील सीपीआर रुग्णालयात दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या नातवालाही करोनाची लागण झाली असून इचलकरंजीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विजापूर येथून येथील काही लोक इचलकरंजी येथे अंत्यविधीसाठी आले होते. अंत्यविधीनंतर विजापूरला गेलेल्या या लोकांपैकी दोघांना करोनाची लागण झाली होती. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इचलकरंजीतील कोले मळा येथील वृद्धाला करोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह १९ जणांना अलगीकरण केले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.

या वृद्धावर इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.२० एप्रिल रोजी त्यांच्या घशाच्या स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना मधुमेहाचे विकार असल्याने आयजीएम येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सीपीआर करोना रुग्णालयात दाखल केले होते. दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज सायंकाळी साडेचार वाजता त्यांचा मृत्यू झाला.