या हंगामासाठी उसाला प्रतिटन एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्यात यावेत, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथे झालेल्या शेतकरी परिषदेत खोत यांनी संयोजक म्हणून मागणीचा ठराव केला.

एफआरपीची रक्कम एकरकमी मिळाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळण्यासाठी सध्या असलेली साखरेची प्रति क्विंटल २९०० रुपयेवरून किमान ३२०० रुपये करावी अशी शिफारस राज्य सरकारने केंद्र शासनाकडे करावी, असाही ठराव त्यांनी मांडला.

यावेळी राज्यातील दुष्काळाची नोंद घेण्यात आली. त्याआधारीत केलेले ठराव याप्रमाणे-

जेथे दुष्काळ जाहीर होईल त्याठिकाणी जलयुक्त शिवार अभियान योजनेची कामे नव्याने करण्याचे आदेश दिले पाहिजेत. बँक कर्ज वसुली व वीज देयक वसुली तसेच शासकीय कर आकारणी थांबवण्यात येतील. दुष्काळी जनतेला अल्प दरात धान्य देण्यात यावे.

शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर पाणंद रस्ते अभियान राबविण्यात यावे. मराठा, मुस्लिम, लिंगायत, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. शेतकरी, ऊस तोडणी कामगारांना रोजगार हमी योजना समावेश करावा.

मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
या ठरावाचा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पूर्वी काही ऊस परिषद होत असत. त्यातील ठराव कोणी ढुंकून पाहत नसत. आता शासनाच्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठराव मंजूर करण्यात आले. प्रत्येक ठरावाला शासन सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.