काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेला जवान नाईक पांडुरंग महादेव गावडे (३२) यांच्यावर आंबोली मुळवदेवाडी येथे लष्करी इतमामात १४ रायफलच्या तीन फेऱ्या झाडून मानवंदना देत अन्त्यसंस्कार करण्यात आले. पार्थिव लष्कराच्या सजवलेल्या गाडीवर ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वा. साश्रुनयनांनी देण्यात आला.

बेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्री मुख्यालयातील लष्करी अधिकाऱ्यांनी शहीद पांडुरंग गावडे यांना मानवंदना दिली. या वेळी इन्फन्ट्रीचे ८५ जवान व अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

श्रीनगरमध्ये दहशतवाद्याशी लढताना शनिवारी पांडुरंग गावडे जखमी झाले होते. त्यानंतर रात्री त्यांना वीरमरण आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आज श्रीनगर-दिल्ली-गोवा ते आंबोली असे दाखल झाले.  लष्करी अधिकाऱ्यांनी पार्थिव घरी आणल्यावर भारताचा तिरंगा पत्नीकडे सुपूर्द केला. गावडे यांच्या पार्थिवाचे पत्नी, वडील, आई, भाई, पुतण्या, वहिनी यांनी दर्शन घेतले.

त्यानंतर गावडे यांच्या मालकीच्या जमिनीत चौथरा करण्यात आला व तेथेच अन्त्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा प्रज्वलने भडाग्नी दिली. आंबोली, गेळे व चौकुळ भागातील सैनिकी परंपरा असणाऱ्या घराघरातून लोक या ठिकाणी आले होते.  अन्त्यसंस्कार झाले तेथे स्मारक उभारण्यात येणार आहे.