काटेपल्लीच्या जंगलात शस्त्रांसह नक्षल साहित्य जप्त
तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर मौजा काटेपल्लीच्या जंगलात नक्षलवादी व पोलिस दलात झालेल्या चकमकीत १६ लाखांचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी व नक्षलवाद्यांच्या मंगी विभागीय समितीचा सदस्य चारलेश उर्फ अथराम शोभन (३०) याच्यासह वरिष्ठ कॅडरचे मुकेश (२५) व दिनेश (१८) या तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात महाराष्ट्र व तेलंगणा पोलिसांना संयुक्त कारवाईत यश आले. अथराम शोभनच्या मृत्यूने चळवळीला जबर हादरा बसला आहे.
काटेपल्लीच्या जंगलात नक्षलवादी मुक्कामाला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर उपविभाग अहेरी पोलिस ठाण्याच्या काटेपल्लीच्या जंगलात गडचिरोली पोलिस दलाचे विशेष अभियान पथक सी-६० व तेलंगणा पोलिसांनी संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबविणे सुरू केल्यावर पहाटे ६-७ वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांना चोख प्रतिकार केला. सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या चकमकीत आदिलाबाद दलमचा कमांडर व विभागीय समितीचा सदस्य अथराम शोभनसह तीन वरिष्ठ नक्षलवादी ठार आले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळ काढला. दरम्यान, प्रत्यक्ष घटनास्थळी पन्नासावर नक्षलवादी होते अशी माहिती आहे. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेतल्यावर ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह, तसेच १ एके ४७ रायफल, १ एसएलआर रायफल व १ ३०३ रायफल, या शस्त्रांसह मोठय़ा प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. हा आधुनिक शस्त्रसाठा बघून ठार झालेले नक्षलवादी चळवळीतील वरिष्ठ कॅडरचे कमांडर किंवा सदस्य वा त्यापेक्षा मोठय़ा दर्जाचे असण्याची शक्यता गडचिरोली पोलिसांनी वर्तविली होती. सध्या त्यांची ओळख पटविण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत नक्षलवादी तेलंगणातील मंगी दलम किंवा आदिलाबाद दलमचे सदस्य असावेत, अशी शंका व्यक्त केली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता या चकमकीत जहाल नक्षलवादी अथराम शोभन ठार झाल्याची धक्कादायक माहिती आहे. अथराम शोभन हा लगतच्या तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्य़ातील रोमपल्लीचा रहिवासी आहे. त्याने आजवर अनेकांच्या हत्या केल्या असून तेलंगणा पोलिसांनी १० लाखांचे बक्षीस त्याच्यावर ठेवले होते. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर त्याची दहशत होती. विशेष म्हणजे, शोभनची पत्नी ज्योतीही जहाल नक्षलवादी असून चळवळीत सक्रीय आहे,. तर या चकमकीत ठार झालेला मुकेश हा छत्तीसगडमधील असून स्पेशल झोनल समिती कमांडरचा अंगरक्षक व दिनेशही छत्तीसगडमधील असून मंगी दलमचा एरिया समिती सदस्य होता. या दोघांवर प्रत्येकी ६ लाखांचे बक्षीस होते. घटनास्थळावरील रक्ताचा सडा बघता या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जबर जखमी झाल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यावर डॉ. अभिनव देशमुख यांची ही पहिलीच नक्षल कारवाई आहे. या घटनेनंतर त्यांनी अहेरी पोलिस मुख्यालयाला भेट दिली.
रवींद्र जुनारकर