रत्नागिरी जिल्ह्य़ातील बेकायदेशीर पर्ससीन नौकांद्वारे होणाऱ्या मच्छीमारीच्या विरोधात पारंपरिक छोटे मच्छीमार गुरुवारी (१९ नोव्हेंबर) जेलभरो आंदोलन करणार आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा बेकायदेशीर पर्ससीन नेटधारकांच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून पारंपरिक मच्छीमारांनी उग्र आंदोलन छेडले असून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्य़ातील पारंपरिक मच्छीमारांनी सुमारे १५ दिवसांपूर्वी येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मात्र त्यानंतर अजूनही बेकायदेशीर पर्ससीन नेटधारकांवर कारवाई करण्यात आलेली नाही, उलट या नौकांच्या मालकांनी गेल्या सोमवारी मत्स्य विभागावर मोर्चा नेऊन कायदेशीर परवाने देण्याची मागणी केली. या पाश्र्वभूमीवर येत्या गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारंपरिक मच्छीमार जेलभरो आंदोलन करणार आहेत.
समितीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष खलिल वस्ता यांनी या संदर्भात मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्य़ात यांत्रिकी व बिगरयांत्रिकी मिळून एकूण सुमारे ३६०० पेक्षा जास्त नौका असून त्यापैकी २६४ मोठय़ा पर्ससीन नेट, तर फक्त १५ मिनी पर्ससीन नेट बोटींची अधिकृत नोंदणी झाली आहे. पण आजच्या घडीला जिल्ह्य़ातील समुद्रकिनाऱ्यांवर साडेतीनशेपेक्षा जास्त अनधिकृत पर्ससीन नेट बोटी मच्छीमारी करत आहेत. अतिशय उथळ पाण्यातही मासे पकडण्याचे तंत्र या नौकांमध्ये असल्यामुळे किनाऱ्यालगतच्या भागात छोटय़ा यांत्रिक किंवा बिगरयांत्रिकी नौकांच्या मदतीने मासे पकडणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून या बेकायदेशीर मच्छीमारीला पायबंद घालून डॉ. सोमवंशी समितीच्या शिफारशींचे कायद्यात रूपांतर करावे, या मागणीसाठी येत्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.