उस्मानाबाद तालुक्यातील जेवळी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक, तसेच जिल्हा बँकेच्या शाखा फोडण्याचा चोरटय़ांचा प्रयत्न तिजोरीचे कुलूप न तुटल्यामुळे फसला. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. सकाळी बँक उघडताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
जेवळी येथे या दोन्ही बँकांचे आíथक व्यवहार मोठे असून नागरिक, तसेच व्यापाऱ्यांनी मोठय़ा संख्येने या शाखांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत. चोरटय़ांनी पहाटेस दोन्ही बँकांचे शटर उचकटून बँकेत प्रवेश केला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत मोठी रक्कम होती. तेथे तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. चोरटय़ांनी तिजोरीच्या िभतीची तोडफोड केली. जिल्हा बँकेतही चोरटय़ांच्या हाती काही लागले नाही. मध्यरात्रीनंतर दोन-तीनच्या सुमारास हा प्रकार घडला असावा, असा अंदाज आहे. जेवळी गावात या वेळी रिमझिम पाऊस सुरू होता. त्याच वेळी गावातील वीजपुरवठाही खंडित होता.
रात्रीची गस्त वाढविण्याची गरज
लोहारा तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. बँक फोडण्याच्या घटनेत चोरटय़ांना तिजोरीचे कुलूप न उघडल्याने रक्कम लुटता आली नाही. मात्र, या घटनेमुळे पोलिसांनी सतर्क राहण्याची, रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. बँकांनीही रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नियुक्त करणे गरजेचे ठरले आहे.