राहाता येथे मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या ठिकाणी बंदोबस्तास असलेले दोन पोलीस मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी ही कारवाई केली. साहेबराव कोरडे, बाबासाहेब शिरसाठ अशी  निलंबित कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांची नेमणूक नगर  पोलिस मुख्यालय येथे होती.

राहाता येथे निवडणूक मतदान यंत्राच्या स्ट्रॉंग रूमवर बंदोबस्ताची ड्यूटी पोलिसांना दिली होती. १२ एप्रिलच्या मध्यरात्री शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तपासणी केली असता बंदोबस्तासाठी तैनात केलेले दोन कर्मचारी दारूच्या नशेत आढळून आले. त्यामुळे याबाबतचा अहवाल त्यांनी  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला.  जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून तडकाफडकी निलंबित केले आहे. निवडणूक काळात सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य व्यवस्थित न बजावल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.