दाभोळमधील आरजीपीपीएलच्या आवारातील घटना

दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आवारात (आरजीपीपीएल) सुरक्षारक्षकाने केलेल्या गोळीबारात वरिष्ठ अधिकाऱ्यासह एक कॉन्स्टेबल मृत्युमुखी पडण्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.
व्यक्तिगत बाचाबाचीतून झालेल्या या विचित्र प्रकारात संबंधित सुरक्षारक्षक हरीशकुमार गौड याच्यासह त्याची पत्नी जखमी झाली आहे.
या प्रकल्पामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) दलाचे सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. त्यापैकी हरीशकुमार याची काल रात्री बी. जी. शिंदे या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली. त्यातून संतापून त्याने शिंदे यांच्यावर गोळय़ा झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी तेथे असलेल्या कॉन्स्टेबल बी. नरेश याच्यावरही हरीशकुमारने गोळीबार केल्याने तोही मृत्युमुखी पडला.
या प्रकारानंतर हरीशकुमारला शांत करण्यासाठी त्याच्या पत्नीला तेथे आणण्यात आले; पण त्याने तिच्यासह स्वत:ला कोंडून घेऊन पुन्हा गोळीबार केला. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकारामागील हेतू अजून स्पष्ट होऊ शकलेला नाही. मात्र व्यक्तिगत बाचाबाचीतून हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.