दोन वाघांच्या झुंजीमध्ये तळोधी येथील टी-१ नावाच्या वाघाचा मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदनातून समोर आली आहे. मृत पावलेला वाघ वयोवृध्द असून संपूर्ण अवयव शाबूत असल्याने विषप्रयोग किंवा त्याची शिकार झाली नसल्याचा दावा ब्रम्हपुरी वन विभागाने केला आहे.    
ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत येणाऱ्या तळोधी वनपरिक्षेत्रातील सारंगड ते लावारी रस्त्याच्या बाजूला जंगलात वाघ झोपलेला असल्याची माहिती तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. चौधरी यांना मिळाली. त्यांनी लगेच सहकाऱ्यांसह घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता त्यांना तो वाघ मरून पडलेला असल्याचे दिसले. लगेच त्यांनी मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे व ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांना वाघाच्या मृत्यूची माहिती दिली. घटनास्थळ तळोधी वनपरिक्षेत्रातील नेरी उपक्षेत्र व बोडधा बिटातील कक्ष क्रमांक ४५५ मध्ये आहे. ते सारंगड ते लावारी रस्त्याजवळ जंगलात सारंगडपासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे माहिती मिळताच मुख्य वनसंरक्षक ठाकरे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहायक वनसंरक्षक ए.एस.मेश्राम यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन मृत वाघाची पाहणी केली. हा वाघ नर असून तो वृध्द असल्याचे दिसून आले. या वाघाचे दोन दात पूर्णत: झिजलेले आहेत. त्याचे संपूर्ण अवयव शाबूत आहेत. मानेवर दोन खोल जुन्या जखमा दिसून आल्या. घटनास्थळी वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करून संपूर्ण पाहणी केली. यानंतर वाघाचा मृतदेह सांवगरगाव काष्ठ भंडार येथे आणण्यात आला.
आज सकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, डॉ. संदीप छोनकर यांनी एनटीसीएचे प्रतिनिधी आदित्य जोशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी बंडू धोतरे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या समक्ष शवविच्छेदन केले. शवविच्छेदनात वाघाच्या मानेवर डोक्याच्या मागच्या भागात दाताच्या सुळ्याच्या दोन खोल जखमा दिसून आल्या. या जखमा बघता दोन वाघाच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी शवविच्छेदनात निदर्शनास आले. वाघाचा मृत्यू दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी मृत वाघाच्या शरीराचे नमुने घेतल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाघाचे नमुने उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या फॉरेन्सिक लॅब व हैदराबादच्या डीएनए अ‍ॅनालेसिससाठी सीसीएमबी लॅबला पाठविण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी दिली. दरम्यान, मृत वाघाचे नाव टी- १ असून २००९ पासून या वाघाचा मागोवा कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून घेण्यात येत होता.

३ महिन्यात ४ वाघांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्य़ात ३ महिन्यात ४ वाघ मृत्यूमुखी पडले. यातील २ वाघांची शिकार करण्यात आली आहे. १८ फेब्रुवारीला वन विभागाने काही शिकाऱ्यांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य चांदा वन विभागाचे बल्लारपूर मार्गावरील जंगलात वाघिणीची शिकार केली, तर ७ एप्रिलला ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील भादुर्णी गावातील गावकऱ्यांनी वाघिणीची शिकार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर २४ एप्रिलला जुनोनात वाहनाच्या धडकेत वाघाच्या मादी छाव्याचा मृत्यू झाला. त्यानंतर काल सोमवारी तळोधी येथे एका वयोवृध्द वाघाचा मृत्यू झाला. फेब्रुवारी ते मे या ३ महिन्यात ४ वाघ गमावल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे.