मेघगर्जनेसह सरी कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज

अरबी समुद्रातून मध्य महाराष्ट्राच्या दिशेने वाहणारे आद्र्रतायुक्त वारे आणि दक्षिण-पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीलगत हवेच्या वरच्या थरात चक्रीवादळाची निर्मिती झाल्याने मध्य महाराष्ट्रमध्ये शुक्रवारी ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याप्रमाणे शनिवारी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मागील आठवडय़ामध्ये राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्या होत्या. त्यानंतर सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. विदर्भात सरासरी ३७, मराठवाडय़ात सरासरी ३६, मध्य महाराष्ट्रात सरासरी ३५, कोकण आणि मुंबईत सरासरी ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. तर राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्याच्या दिशेने वाहणाऱ्या आद्र्रतायुक्त वाऱ्यामुळे आता पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा फटका मध्य महाराष्ट्राला बसणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गुरुवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ३९.७, तर सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

उन्हाचा दाह वाढला

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबईसह राज्यामध्ये १८ मार्चला अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे पहाटे काहीशी थंडी जाणवत आहे. मात्र, दुपारी कडक ऊन पडत असल्याने घामाच्या धाराही निघत आहेत. शहरात गुरुवारी ३४.६ अंश सेल्सिअस कमाल आणि १४.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल २ अंशांनी कमी नोंदविले गेले.  पुढील दोन ते तीन दिवस राज्यात आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान किंचित वाढणार आहे.

प्रमुख शहरांमधील तापमान

मुंबई (कुलाबा) ३१.६/२३.०, सांताक्रुझ ३२.०/२०.६, अलिबाग ३०.७/२३.४, रत्नागिरी ३३.७/२१.८, भिरा ३९.५/१७.०, पुणे ३५.२/१४.४, महाबळेश्वर ३०.७/१६.०, नाशिक ३३.८/१४.६