17 October 2019

News Flash

सांगलीत भाजपाला ‘वंचित’चा आधार

आरक्षण प्रश्नावरून विरोधात जाणारी मते वंचितचे गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली मते भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरली.

विजयानंतर भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केला.

दिगंबर शिंदे

जिल्ह्य़ातील काँग्रेस, राष्ट्रवादी पुरती नामोहरम

लोकसभेच्या सांगली मतदारसंघातून विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवत असताना गलितगात्र काँग्रेसला आणि व्यक्तिकेंद्रित राष्ट्रवादीला पुरते नामोहरम करीत इतिहास रचला. अखेरच्या क्षणी मदानात उतरलेल्या वसंतदादांचे नातू विशाल पाटील नवे चिन्ह असतानाही मते चांगली घेतली असली तरी ‘वंचित’चा फटकाही बसला. आरक्षण प्रश्नावरून विरोधात जाणारी मते वंचितचे गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली मते भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरली.

उमेदवारी अर्ज दाखल करताच भाजपने औदुंबरच्या डोहात मतभेद बुडविले असल्याचे सांगत  दत्तात्रयांच्या साक्षीने प्रचाराचे नारळही कृष्णाकाठी फोडले. तरी काँगेसमध्ये  आ. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यामध्ये तू-तू, म-म सुरू होते. या वादात पक्षश्रेष्ठीकडून सांगलीची जागाच स्वाभिमानीला सोडण्यात आली. यामुळे उमेदवारीचा घोळ आणखी जादाच निर्माण झाला.

भाजपमधील नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द उपयोगी ठरणारा असल्याने ही सांधेजोड करण्याचे काम सचिव मकरंद देशपांडे यांनी केले. कडेगावच्या देशमुख वाडय़ावरील पृथ्वीराज देशमुख, केंगनोळीच्या सरकारवाडय़ातील अजितराव घोरपडे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे सुरेश खाडे, जतचे रवी तमणगौंडा पाटील आदींची नाराजी दूर करीत असताना विधानसभेसाठी त्यांचा मार्ग सुकर करण्याचे प्रयत्न झाले.

एकीकडे पडळकर यांच्या उमेदवारीने धनगर मतदार संघटित झाला होता, तर दुसरीकडे मराठा मतदारामध्ये विभागणी अपरिहार्य दिसत होती. अशा प्राप्त स्थितीमध्ये जतमध्ये मोठय़ा संख्येने असलेला लिंगायत समाज दूर जाण्याचा धोका ओळखून रवी पाटील यांचे योगदान महत्त्वाचे होते, ते काम नीता केळकर यांनी केले. आ. विलासराव जगताप यांच्या विरोधात असलेली पक्षांतर्गत नाराजी लोकसभेवेळी उफाळून येणार नाही याची दक्षता स्थानिक नेतृत्वापासून प्रदेश पातळीवरील नेतृत्वाने घेतली. याचबरोबर दस्तुरखृद्द खासदार पाटील यांना पक्ष निरपेक्ष मत्रीही कामी आली असेच म्हणावे लागेल. त्यांनी गेली पाच वष्रे पक्षविरहीत राजकारण करीत असताना काही प्रमाणात भाजपमध्ये शत्रू निर्माण केले. या  उपद्रव मूल्यांना फारसे महत्त्व न देता काँग्रेसची रणनीती ठरण्यापूर्वीच आघाडीतील मित्रांना आपलेसे करीत प्रचाराला जुंपले. खानापूर-आटपाडीमध्ये पडळकरांचे होमपिच असल्याने होणारी मतांची वजावट शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांच्याशी जुळते घेऊन केली. यशवंत कारखान्याचा विषय बाजूला ठेवून त्यांची मदत घेत असताना आटपाडीच्या देशमुखाबरोबरच तानाजी पाटलांची मदतही मोलाची ठरली.

पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकीचा अनुभव घेत असलेल्या विशाल पाटील यांना एकहाती नियोजन, प्रचार यामुळे जुगाड करण्यासाठी वेळही कमी मिळाला. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने या प्रचारात केवळ सांगकाम्या,  ओ नाम्याचीच भूमिका बजावली. तासगावमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकत्रे रिचार्ज करण्यासाठी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी दौरा केला, मात्र आ. सुमनताई पाटील यांच्या मर्यादाही या निवडणुकीत स्पष्ट झाल्या. आगामी काळातही पक्षाला धोक्याचा इशारा ठरण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत.

या कालावधीत अंतिम क्षणी स्वाभिमानीच्या उमेदवारीची आस धरून असलेल्या पडळकरांनी वंचितची उमेदवारी घेत प्रचाराचा झंझावात आणला. आक्रमक वक्तृत्व, जोरदार टीका, प्रसंगी असंसदीय भाषेचा वापर करीत तरुणाई आकर्षति करण्याची कला मूळचा अभिनेत्याचा असलेला िपड पडळकरांनी निवडणूक िरगणात बेमालूमपणे वापरला.

सिंचन योजनांना मिळालेली गती, राष्ट्रीय महामार्गाची सुरू असलेली कामे, जतच्या दुष्काळी भागात वाहती झालेली कृष्णामाई यामुळे दुष्काळाची दाहकता भाजपला फारशी बसली नाही. मात्र दिल्लीच्या राजकारणात गल्लीचा वाद टोकाला गेला असला तरी संयमाने ही निवडणूक पार पडली हेही महत्त्वाचेच मानले पाहिजे.

एकूण झालेले मतदान- ११ लाख ९२ हजार ५७१

संजयकाका पाटील विजयी (भाजप) – ५ लाख ८ हजार ९९५

विशाल पाटील (स्वाभिमानी) –  ३ लाख ४४ हजार ६४३

गोपीचंद पडळकर (वंचित आघाडी) – ३ लाख २३४

First Published on May 25, 2019 1:00 am

Web Title: vanchit bahujan aghadi support to bjp in sangli