19 January 2019

News Flash

चला उठा सकाळ झाली.. श्रमदानाची वेळ आली..

कर्जतसारख्या तालुक्याचे गाव असलेल्या गावाला सलग ४९ दिवस नळवाटे पाणी सुटले नाही

दुष्काळावर मात करण्यासाठी मी काम करणार या एकाच विचाराने काम करीत असल्याचे दिसून येते.

कर्जत तालुका हा राज्यामध्ये दुष्काळी तालुका अशी ओळख असलेला. दुष्काळ या तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला. पावसावर अवंलबून असलेली शेती. बारामहीने पाणीटंचाईच्या झळा सोसत येथील अनेक पिढय़ा लहानाच्या मोठ्या झाल्या. यामुळे पाण्याचे महत्त्व या तालुक्यातील जनतेच सांगलेच माहीत. घरातील महिला ज्या पाण्याने कपडे व भांडी धुतात तेच पाणी पुन्हा परसबागेला किंवा घरासमोर सडा मारण्यासाठी वापरात आणतात. ही येथील पाणी वापराची संस्कृती आहे. तर पुरुष मंडळी अंघोळीला जाताना दाढी करतात यामुळे तोंड धुण्यासाठी पुन्हा वेगळ्या पाण्याची गरज नाही.. हे सर्व आपल्याला अतिशयोक्ती वाटू शकते मात्र हे खरे आहे कारण येथील माणसांच्या डोळ्यामध्ये जेवढे पाणी आहे, तेवढेही जर नळावाटे येत नसेल तर येथील जनतेने काय करावे..

कर्जतसारख्या तालुक्याचे गाव असलेल्या गावाला सलग ४९ दिवस नळवाटे पाणी सुटले नाही, अशा विक्रमाची नोंद येथे झाली आहे..

सहभागी गावांना मिळणार बक्षीस

पाणी फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा ४५ दिवस होणार आहे, यामध्ये जे गाव लोकसहभागामधून चांगले काम करेल त्या गावास पाणी फाउंडेशन घसघसीत बक्षीस देणार आहे. या शिवाय गावामध्ये विकास कामे करण्यासाठी मोफत जेसीबी पण देणार आहे मात्र यासाठी त्या गावाला प्रथम २० गुण मिळवायचे आहेत.

यातील २० गुण कसे मिळतात हे पाहू. सर्व प्रथम पाणी फाउंडेशन अ‍ॅप्लिकेशन मध्ये लॉगइन केल्यानंतर मुख्य पानावर दिलेल्या फॉम्र्स मधील ‘नियोजन फॉर्म’ मध्ये जाऊन ‘नियोजित मृद व जलसंधारण उपचार’ या वर क्लिक करून नवीन एन्ट्री मध्ये प्रस्तावित रोपवाटिकामधील गावाच्या लक्ष्याप्रमाणे लोकसंख्या आधारित रोपांची संख्या प्रति व्यक्ती २ रोप प्रमाणे भरून घ्यावी.  रोपवाटिकेतील नियोजित रोपांच्या संख्येप्रमाणे रोपांची पिशवी गादीवाफा पद्धतीने बीज लागवड करून रोप निर्मिती करावी व अपेक्षित संख्येच्या प्रमाणात या रोपांची संख्या जास्त ठेवावी. जादा रोपांची लागवड केल्यास काही प्रमाणात उगवू शकले नाहीत किंवा रोपे जळली तर  अपेक्षित प्रमाणात रोपवाटिकेत रोपांची संख्या शिल्लक राहतील. उगवलेल्या रोपांची खात्री करून किंवा जादा लागवड केलेल्या रोपांच्या प्रमाणात ‘मोजमाप पुस्तिकेत’ जाऊन मृद व जलसंधारण उपचार  येथे क्लिककरून सर्च वरील स्क्रोल वरती क्लिक करत उपचार निवडण्यासाठी येथे बोट ठेवावर क्लिक करून रोपवाटिका हा उपचार निवडून सदर रोपवाटिकेतील जिवंत उगवलेल्या रोपांची संख्या अर्जात भरून घ्यावी व ही माहिती सादर (सबमिट) करावी. असे केल्यास  ५ गुण गावास मिळतील. तसेच मोजमाप पुस्तिकेत दर्शवल्याप्रमाणे ‘जलबचत, माती परीक्षण व आगपेटीमुक्त शिवार’ यातील नवीन नोंदी भरण्यासाठी गावातील उपलब्ध खातेदार यादी प्रमाणे शेतकरीनिहाय शेतकऱ्याचे नाव भरून ही पुढील माहिती भरावी लागेल. जलबचत, माती परीक्षण व आगपेटीमुक्त शिवार यातील १५ गुण मिळण्यास आपल्या गावास आपणास मदत करेल. सर्वप्रथम खातेदार यादी प्रमाणे शेतकऱ्यांचे नाव मोजमाप पुस्तिकेत भरून जलबचत करण्याच्या दृष्टीने रब्बी हंगामातील पीकपेरा उद्दिष्टाप्रमाणे या ठिकाणी गट व सर्वे नंबर भरून रब्बी लागवडी खालील क्षेत्र भरावे. ही माहिती दोन विभागात असून या ठिकाणी स्पर्धे दरम्यान किंवा स्पर्धेपूर्वी केलेल्या जलबचतीच्या उपचारांच्या ठिकाणी हेक्टरप्रमाणे नमूद करावी. जर हा शेतकरी रब्बी हंगामात पीक घेत नसेल तर या ठिकाणी ‘रब्बी खालील एकूण क्षेत्र’ या इथे ‘०’ लिहावे कारण ’अर्जामध्ये एखादी माहिती नाही भरल्यास या शेतकऱ्यांची माहिती सादर होणार नाही याची नोंद घ्यावी. या साठी ५ गुण आपण शेतकरीनिहाय माहिती भरून पूर्ण करू शकाल. पुढील उपचारांची माहिती ‘माती नमुना तपासणी केली आहे का?’  तिथे होय म्हणून क्लिक करावी व तपासलेल्या नमुन्यांची संख्या प्रति परीक्षण अहवालाप्रप्रमाणे दर्शवावी. जर या ठिकाणी सदर शेतकऱ्याने माती नमुना तपासणी केली नसेल, तरी ‘माती नमुना तपासणी केला आहे का?’ वर ‘हो म्हणून ’तपासलेल्या नमुन्यांची संख्या यात ‘०’ असे नमूद करावे. ‘आगपेटीमुक्त शिवार’ या ठिकाणी येऊन आगपेटीमुक्त शिवाराचा प्रकार यातील उपचार निवडा. वर दर्शवल्याप्रमाणे स्पर्धेपूर्वी करण्यात आलेली उपचार कामे नमूद करावी. क्षेत्राप्रमाणे संख्या किंवा लांबीही दर्शवून फोटो घ्यावा व ही माहिती ‘सबमिट’ करावी. वरील माहिती भरून झाल्यास यात काही फेरबद्दल किंवा चुकीची माहिती सुधारून भरण्यासाठी ‘नोंदीची यादी’ मध्ये जाऊन शेतकरीनिहाय माहिती योग्य ते पाहून भरावी? ‘या आगपेटीमुक्त साठी ’५ गुण मिळतील’ असे २० गुण झाल्यावर गावासाठी किमान २५० तास मोफत जेसीबी मशिन हे भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून मिळू शकेल.

कर्जत तालुक्यात दुष्काळ मुक्तीचे तुफान आले आहे, या सर्व गावांमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या सोबत कर्जत शहरातील विविध महिला संघटनांचे सदस्य, रोटरी क्लब ऑफ सिटीचे सदस्य, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, प्रांतआधिकारी, तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी यांचेसह सर्व शासकीय अधिकारी याच बरोबर भारतीय जैन संघटनेचे सदस्य जाऊन रोज सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत अतिशय उत्साहाने श्रमदान करीत आहेत. यामध्ये टिकाव व फावडे हातामध्ये घेऊन दगडमाती उचलणे, चर खांदणे, बांध तयार करणे अशी अनेक कामे करीत आहेत. हे करताना आपण कोणी तरी आहोत हे विसरून जाऊन काळ्या मातीचे ऋण फेडण्यासाठी आणि दुष्काळावर मात करण्यासाठी मी काम करणार या एकाच विचाराने काम करीत असल्याचे दिसून येते. काम करताना ‘हम सब एक साथ – दुष्काळाशी दोन हात ’अशा घोषणा देऊन प्रेरणा जोश संचारतो. ‘उठा उठा सकाळ झाली.. श्रमदानाची वेळ आली..’ असा संदेश संपूर्ण राज्याला कर्जत तालुका देत आहे.

कर्जत तालुका बदलतो आहे

पिढ्यान पिढ्याचे दुष्काळी चित्र मला बदलायचे आहे, हे ठरवून कर्जत तालुक्यातील ४१ गावे पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते’ या वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये दुरगांव ,चापडगाव, निबें, टाकळी खाडेश्वरी,भोसे,चखालेवाडी, बेलगाव, तिखी, डिकसळ, रेहकुरी, आखोनी, खांडवी, खुरगेवाडी, नागलवडी, डोबांळवाडी, बाभुळगाव खलसा, बजंरगवाडी, खडाळा,गोयकरवाडी, आबीजळगाव, बारडगाव सुद्रिक, जळगाव, कोकणगाव, कापरेवाडी, करमनवाडी, कानगुडवाडी, राक्षसवाडी बुद्रुक, निमगाव डाकू, तळवडी, मिरजगाव, गोदडी, घुमरी, नागमठाण, मुळेवाडी, कौझण, मादंळी, कुभेफळ, आळसुंदे, परिटवाडी, पाटेगाव यांचा समावेश आहे. ही सर्व गावे केवळ सहभागी झाली नाहीत तर माझ्या गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब मी गावातच अडविणार आणि माझे गाव पाणीदार करणार, या भूमिकेने सर्व जण श्रमदान करीत आहेत.

First Published on April 16, 2018 4:02 am

Web Title: village in karjat taluka participate in satyamev jayate water cup 2018 organized by paani foundation