आषाढी यात्रेत भाविकांचे मुक्तहस्ते दान

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आषाढी यात्रा कालावधीत  विविध माध्यमातून विक्रमी ४  कोटी ४० लाख ३७ हजार  ७८६  रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यंदाच्या आषाढी यात्रेला विक्रमी गर्दी झाली होती. या वर्षी विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन ७ लाखाहून अधिक भाविकांनी घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत समितीच्या उत्पन्नात विR मी १ कोटी ५० लाखाची वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. विठूरायाला भाविकांनी मुक्तहस्ताने दान दिले आहे.

वारकरी सांप्रदायात आषाढी महत्त्वाची वारी मानली जाते. यंदाच्या वर्षी राज्यात सर्वदूर पाऊ स झाला. त्यामुळे शेतीची कामे आटोपून भाविकांनी पंढरीची वाट धरली. यंदाची आषाढी वारी विR मी झाली. यात्रा काळात म्हणजेच ३ जुलै ते १७ जुलै या १५ दिवसात समितीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. यामध्ये श्री विठ्ठलाच्या पायावर ठेवलेल्या दानातून ३९ लाख ६३ हजार ४२४ रूपये तर श्री रूक्मिणी मातेच्या पायावर ठेवलेल्या दानातून ७ लाख ७२ हजार १८०  रूपये प्राप्त झाले आहेत. तसेच देणगी पावती मधून १ कोटी ८४ लाख ५४ हजार ९१ रूपये, बुंदीलाडू प्रसाद विक्रीमधून ७२ लाख ४६८ हजार २२० रूपये तिजोरीत जमा झाले आहेत.

नव्याने बांधण्यात आलेला अलिशान भक्त निवास यंदाच्या आषाढीला भाविकांसाठी खुला केला होता. या भक्तनिवास मधून १८ लाख ९१ हजार ६०५ रूपये उत्पन्न मिळाले. या सह विविध माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला यंदाच्या वर्षी ४ कोटी ४० लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

गेल्या वर्षी म्हणजे २०१८ च्या आषाढीत  समितीला २ कोटी ९० लाख उत्पन्न मिळाल्याची माहिती सचिन ढोले यांनी दिली.गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १ कोटी ५० लाख रुपयाचे विRमी उत्पन्न समितीला मिळाले आहे. मंदिर समितीचा कारभारात पारदर्शीपणा आणि सुसूत्रता आल्याने देणगीदारांचा ओघ वाढला आहे. परिणामी समितीच्या  उत्पन्नात वाढ झाली. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना अधिक सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत.

समितीचे विविध उपक्रम

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी मंदिर समितीचा पदभार स्वीकारल्यापासून समितीच्या उत्पन्नात वाढ होत आहे. यंदाच्या आषाढीला समितीने पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांना त्रास होऊ  नये म्हणून रबरी मॅट अंथरले होते. या शिवाय भारत सेवाश्रम , कलकत्ता, वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट  यांनी मोफत औषधोपचार केले. याच बरोबरीने समितीने आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. या शिवाय शहरातील काही रस्ते,वाळवंट स्वच्छतेचे काम समिती करीत आहे.