रखडलेल्या महिला रूग्णालयाच्या बांधकामास निधी उपलब्ध झाल्याने रूग्णालयाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २०२१-२२ या वर्षात १ कोटी ३ लक्ष रूपयाच्या निधीची तरतूद झाल्याचे पत्र दिले आहे. यापैकी एक कोटी रूपयाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरीत करण्यात आला आहे. तसेच बांधकामाच्या २१ कोटी २३ लक्ष रूपयाच्या अंदाज पत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही शासनस्तरावर करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना सूचित केले.

सामान्य रूग्णालयाच्या परिसरात शंभर खाटांचे महिला रूग्णालय २०१३ मध्ये मंजूर झाले होते. १४ कोटी रूपये खर्चून हे रूग्णालय २०१८ पर्यत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतू निधी न मिळाल्याने काम थंड्या बस्त्यात पडले. याविषयी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतल्यानंतर तत्कालिन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रूग्णालयाचा प्रस्ताव नव्याने तयार करण्याचे आदेश दिले. मात्र या दरम्यान रूग्णालयाचा अपेक्षित १४ कोटी रूपयाचा खर्च २१ कोटी २३ लक्ष रूपयावर पोहोचला. त्याची तरतूद अर्थमंत्री असतांना मुनगंटीवार यांनी केली होती. त्यामूळे ८० टक्के काम पूर्ण झाले. जुजबी काम शिल्लक आहे.

करोना काळात रूग्णखाटांची संख्या अपुरी पडत असल्याने आमदार भोयर यांनी बांधकामाबाबत पाठपुरावा केला होता. आता तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असतांना रूग्णालयाचा प्रश्ना नव्याने उपस्थित झाला. त्या अनुषंगाने आमदार भोयर यांनी गत मे महिन्यात मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. त्याचा संदर्भ देत आरोग्यमंत्री टोपे यांनी बांधकामास निधी मंजूर झाल्याचे भोयर यांना कळविले आहे. हे रूग्णालय पूर्ण झाल्यास सामान्य रूग्णालयावरचा ताण कमी होण्यासोबतच संभाव्य करोना रूग्णांची सोय होईल, असे मत व्यक्त केले आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने भूगाव येथे १०७ कोटी रूपये खर्चाचे जम्बो रूग्णालय मंजूर केले आहे. ते तात्पूरतेच राहणार असून महिला रूग्णालय मात्र जिल्ह्यासाठी कायमची सोय ठरेल, असे  भोयर यांनी स्पष्ट केले.