हेमेंद्र पाटील

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातून निघणारे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे चेंबर गाळ साचून तुडुंब भरले आहेत. रासायनिक पाणी जाण्याचे मार्ग बंद झाल्याने सांडपाणी रस्त्यावर आले आहे. औद्योगिक क्षेत्रातील सर्वच झोनमध्ये ही स्थिती असताना देखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वाहिनीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहेत. ठेकेदारांच्या दरवर्षी खिसे भरले जातात. त्यामुळे कामे अपूर्ण राहत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातून रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर निघणारे सांडपाणी हे कारखान्यातील प्रक्रिया केंद्रात शुद्ध करणे बंधनकारक असते. परंतु अनेक कारखानदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रासायनिक सांडपाणी हे थेट सामुहिक प्रक्रिया केंद्रांच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत सोडत असल्याने रासायनिक सांडपाण्याचा गाळ हा वाहिन्यांमध्ये साचला जातो. रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नेहमीच मुख्य वाहिनीत येत येत आहे.

वाहिन्या आणि चेंबरमधील गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वाहिनीद्वारे नेण्यात येणाऱ्या वाहिन्यांना ठिकठिकाणी वाहिनी स्वच्छ करण्यासाठी चेंबर ठेवण्यात आले असून हे चेंबर स्वच्छ करण्यासाठी वर्षांकाठी ४५ लाखांचा खर्च केला जात असल्याची माहिती उजेडात आली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र औद्योगिक क्षेत्रातील चेंबर गाळ साचल्याने तुडुंब भरलेली पाहावयास मिळत आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी औद्योगिक क्षेत्रातील सर्व भागातील चेंबर स्वच्छ करणे  बंधनकारक असतानाही औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत केले आहे. शासनाचे लाखो रूपये कामे न होताच खर्च दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांची ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

औद्योगिक क्षेत्र परिसरात जमिनीआणि पाणी प्रदूषणाचा स्तर उंचावला आहे. याविषयी औद्योगिक विकास मंडळाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांना संपर्क साधला असता त्यांनी पावसाचे पाणी माघारी येत असल्याने रासायनिक सांडपाणी चेंबर बाहेर येत असल्याचे कारण दिले.

सांडपाणी पर्जन्यजल वाहिन्यांत

औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केद्रांत जाण्या अगोदरच नादुरुस्त वाहिन्या व तुंबलेल्या चेंबर मधुन रासायनिक सांडपाणी बाहेर येत असल्याने औद्योगिक क्षेत्र परिसरात मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. यातच काही प्रदुषणकारी कारखाने थेट रासायनिक सांडपाणी रात्रीच्यावेळी पर्जन्यजल वाहिन्यांमध्ये सोडत असल्याने परिणामी येथील शेत जमीनी नापीक झाल्या आहेत. कूपनलिकांमधून रसायनयुक्त पाणी येत आहे.