यंदा समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने मराठवाडयातील धरणांनी जानेवारीतच तळ गाठायला सुरूवात झाली असून विभागातील ८७२ प्रकल्पांमध्ये आजमितीला केवळ १३. ६३ टक्‍केच पाणीसाठा शिल्लक असून मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होणाची शक्यता आहे. तर मध्यम प्रकल्पात सर्वात कमी ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मराठवाडयात पर्जन्यमानाचे प्रमाण दिवंसेदिवस कमी होत असून पडणाड्ढया पावसाचे प्रमाणही कमी-कमी होत आहे.

विभागाचे वार्षिक पर्जन्यमान ७७९.०० मि. मी. असून विभागात सप्टेबंरअखेर ४८६. ९८ मि मी. पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या ६२. ५१ टक्के पाऊस झाला आहे. तसेच बीड जिल्ह्यात ४९ टक्केच पाऊस झाला असून औरंगाबादसह, परभणी, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम विभागातील ‘येलदरी’, ‘सिध्देश्वर’ आणि माजलगाव, माजंरा, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना – कोळेगाव ही मोठी धरणं कोरडीच असून मराठवाड्यातील पाण्याची टंचाई गंभीर होत चालली आहे.

मराठवाड्यातील पाणीसाठे अटत असून परिणामी टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. आगामी काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्यास्थितीत मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये १५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून १८ जानेवारी रोजी ७५ मध्यम प्रकल्पांत ९.९ टक्‍के; तर ७४९ लघुप्रकल्पांत केवळ ९ टक्‍केच साठा आहे. तसेच गोदावरी नदीवरील १३ प्रकल्पवजा बंधा-यांमध्ये १४ . ३५ टक्‍के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधा-यांत केवळ १.५ टक्‍केच पाणी शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्पांत केवळ १० टक्के साठा
मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पांत केवळ १० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पात केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक असून जालना येथील ७ प्रकल्पात २ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात ६ टक्के, लातूर ८ प्रकल्पात १६ टक्के, उस्मानाबादेतील १७ प्रकल्पात ९ टक्के, नांदेड जिल्ह्यातील ९ प्रकल्पात २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून परभणीतील २ मध्यम प्रकल्पात १३ टक्के पाणीसाठा आहे.