News Flash

सोमवारनंतर पाणी सोडण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाचाही पर्याय!

नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा व मुळा आणि नाशिक जिल्ह्य़ांतील गंगापूर, दारणा या धरणांमधून मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरेसा पोलीस बंदोबस्त व वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही झाल्यानंतर, सोमवारनंतर पाणी सोडण्यात येईल. मुळेचे पाणी अवघ्या चार दिवसांत तर भंडारदऱ्याचे पाणी जाण्यास तब्बल चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. सोमवारनंतर पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वीच जायकवाडीत पाणी सोडण्याचा आराखडा जलसंपदा विभागाने तयार केला. जिल्हाधिकारी अनिल कवडे व पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. आता नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून एकाच वेळी पाणी सोडले जाणार आहे. अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पाणी सोडण्याची कार्यवाही केली जाईल, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
भंडारदरा धरणातून श्रीरामपूर शहरासाठी सोडलेले पाण्याचे आवर्तन तीन दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले. आता वीजनिर्मितीसाठी भंडारदऱ्यातून ८४९ क्युसेक्सने निळवंडेत पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. भंडारदऱ्यात ६ हजार ५२४ तर निळवंडेत ५ हजार २९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. जायकवाडीत साडेसहा टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याने आता लाभक्षेत्रात एकही शेतीचे आवर्तन होणार नाही. धरणाच्या इतिहासात प्रथमच पिकांना खरिपात एकही आवर्तन न देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भंडारदऱ्यातून निळवंडेत केवळ १ हजार ४०० क्युसेक्सने पाणी सोडता येईल. ते जमा झालेले पाणी निळवंडेतून २ हजार क्युसेक्सने पाणी सोडले जाईल. ४० दिवसांपेक्षा जास्त दिवस निर्धारित पाणी जायकवाडीत जाण्यासाठी कालावधी लागेल. हा कालावधी चार-पाच दिवसांनी वाढू शकतो. तांत्रिक कारणामुळे जास्त क्षमतेने पाणी काढणे शक्य नाही. नदीकाठचा वीजपुरवठा २१ तासांपेक्षा जास्त कालावधीत बंद ठेवला जाणार आहे. त्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीची गरज आहे. त्यामुळे लगेच पाणी सोडण्याऐवजी दिवाळीनंतर दोन दिवसांनी पाणी सोडावे, असा प्रशासनाचा विचार सुरू आहे. मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, ऊर्जामंत्री, महसूलमंत्री हे काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मुळा धरणात १५ हजार ३११ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. धरणातून केवळ १ हजार २२१ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडता येणे शक्य आहे. मुळा नदीपात्रातून ७ हजार क्युसेक्सने पाणी सोडले जाणार असून, अवघ्या तीन दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल. मुळा व प्रवरा तसेच गोदावरी नदीपात्रातील बंधाऱ्यात पाणी अडविले जाणार नाही.
 अंधारलेली दिवाळी
जायकवाडीला पाणी चालल्याने शेतीसाठी एकही आवर्तन होणार नसल्याने लाभक्षेत्रात ही काळी दिवाळी ठरणार आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केल्याने दिव्यांनी आसमंत उजळून निघण्याऐवजी अंधारलेल्या दिवाळीला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2015 3:10 am

Web Title: water release after monday
टॅग : Shrirampur
Next Stories
1 महाविद्यालयात शिवसैनिकांची गुंडगिरी
2 रत्नागिरीत आज डॉ. जावडेकर सादर करणार ‘लयपश्चिमा’
3 वामन पंडित यांचे रानफुलं छायाचित्र प्रदर्शन सुरू
Just Now!
X