वाईकरांनी अटलजींच्या तर्कतीर्थाबरोबरच्या गप्पांच्या आठवणी जागवल्या

विश्वास पवार, वाई

प्राचीन भारतीय वाङ्मय, वेद, वैदिक कालखंड, वैदिक परंपरा या विषयी कुतूहल असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी यासाठी थेट वाई क्षेत्री भेट दिली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली होती. त्या वेळी राजकारणात एवढय़ा मोठय़ा पातळीवर सक्रिय असूनही अशा बहुविध विषयांबद्दल असलेल्या ज्ञानलालसेबद्दल शास्त्रीजींनी वाजपेयींचे कौतुक केले होते. वाजपेयींच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या भेटीच्या या हृद्य आठवणी वाईकरांनी शुक्रवारी दिवसभर जागवल्या.

प्राचीन वाङ्मयाच्या ओढीने वाजपेयी २४ मार्च १९८४ रोजी एक दिवसाच्या मुक्कामासाठी वाईला आले होते. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जाणीवपूर्वक या दौऱ्यामध्ये वाईचा समावेश केला होता. वाईला आल्यावर ते थेट तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींच्या घरी गेले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींच्या विद्वत्तेबाबत त्यांना पूर्ण माहिती होती. त्यांच्याकडून प्राज्ञपाठ शाळा, धर्मकोश ,मराठी विश्वकोश याचे कामकाज कसे चालते हे अटलजींना जाणून घ्यायचे होते. ‘राजकीय धामधुमीचा काळ असला, तरी ज्ञान संपादनाच्या ओढीने मी येथे आलो आहे,’ असे त्यांनी तर्कतीर्थाना सुरुवतीलाच सांगितले. या वेळी तर्कतीर्थांसोबत त्यांचे सहकारी शास्त्री पंडित हे देखील होते.

या वेळी अटलजींनी इथे असलेल्या प्राज्ञमठ, प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या कार्याची माहिती जाणून घेतली. गुरु स्वामी केवलानंद सरस्वती यांनी आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ १९१६ साली वाई येथे प्राज्ञमठाची स्थापना केली. पुढे त्याच प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या वतीने वैदिक शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण अभ्यासR माच्या शाळेत रूपांतर झाले. हा सारा बदल, त्याचे कार्य आणि सद्य:स्थिती याबाबत वाजपेयी खूप सखोलपणे माहिती घेत होते. स्वत: वाजपेयी यांना संस्कृत भाषेबद्दल मोठी आत्मीयता असल्याने या जाणून घेण्यातही मोठा व्यासंग आणि चौकसपणा दडल्याचे त्या वेळी उपस्थित असलेल्या अनिल जोशी, मधू नेने यांनी सांगितले.

केवलानंद यांनी संस्कृत मीमांसा कोश तयार करून धर्मकोशाचे काम सुरू केले होते. या दोन्हीही कोशांचे काम वाजपेयींनी पाहिले. प्राज्ञपाठ शाळेतील जुन्या हस्तलखित पोथ्या त्यांनी चाळल्या. या संदर्भात तर्कतिर्थाबरोबर त्यांनी विस्तीर्ण चर्चाही केली. पुढे मराठी विश्वकोश कार्यालयाला भेट देऊन त्यांनी विश्वकोशाच्या कार्याबद्दल माहिती घेतली. या वेळी बोलताना वाजपेयी म्हणाले, ‘हा तर विश्वाचा कोश आहे!’ त्यांनी विश्वकोश उघडून त्यातील नोंदी, त्या करण्याची पद्धत आदींबद्दल विचारणा केली. या वेळी तत्कालीन संपाकदांबरोबर वाजेपयींची प्राचीन भारतीय वाङ्मय, वेद, वैदिक कालखंड, वैदिक परंपराचा नव भारत उभारणीत उपयोग याबाबत चर्चा झाली.

यानंतर वाजपेयी वाईतील द्रविड हायस्कूलच्या मैदानावरील सभेला गेले. जाताना लक्ष्मणशास्त्रींना सोबत घेऊन गेले. वास्तविक तर्कतीर्थ कोणत्याही राजकीय व्यासपीठावर जात नसत. पण अटलजींनी व्यासपीठावर यावेच लागेल असे सांगून शास्त्रीजींना व्यासपीठावर नेले. वाजपेयींच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या भेटीच्या या सर्वच हृद्य आठवणी शुक्रवारी वाईमध्ये पुन्हा जिवंत झाल्या.