12 December 2019

News Flash

वसुंधरादिनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ला सुरुवात

कृतिदिन साजरा करून पाण्याचे महत्त्व सर्वासमोर ठेवले.

जागतिक वसुंधरादिनी प्रा. गिरिधर परांजपे यांनी शासनासमोर ठेवलेल्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या मॉडेल प्रस्तावाचा शुभारंभ इन्सुली येथे प्रत्यक्षात खड्डे खणून केला. त्यासाठी सर्वाचे मोलाचे सहकार्य लाभले. हा कृतिदिन साजरा करून पाण्याचे महत्त्व सर्वासमोर ठेवले. पाण्याची गंभीर समस्या पाहून प्रा. गिरिधर परांजपे यांनी भूगर्भात पाणी जिरविणारा प्रकल्प शासनास सादर केला. प्रत्येक नागरिकाने येत्या पावसाळ्यात पाच फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट खोल मापाचा किमान एक तरी खड्डा/चर खणून त्यात पाणी जमवून जमिनीत जिरविण्याचे पवित्र काम करावे, असे प्रा. परांजपे म्हणाले. राज्यभरात पाच फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट खोल या मापाचे दहा लाख खड्डे खणून त्यातील पाणी जमिनीत मुरविल्यास सुमारे साठ कोटी घनफूट पाणी आपण जमिनीत मुरविल्यासारखे होईल. त्यामुळे एक लहानसे धरणच जमिनीत बांधल्यासारखे होईल. त्यासाठी जमीन भूसंपादन नाही किंवा पुनर्वसनदेखील नाही असे प्रा. परांजपे म्हणाले.

प्रा. गिरिधर परांजपे यांनी पाणी अडविण्याचे निर्माण केलेले मॉडेल भीषण पाणीटंचाई पाहता उपयुक्त असून कोणीही मॉडेलचा वापर करू शकतो असे कौतुक स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले (तळीकर) प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. मिलिंद भोसले, अभिनव फाउंडेशन व ग्रंथालयाचे ओंकार तुळसुलकर, डॉ. संजना ओटवणेकर, मानसी भोसले, कु. संजा परांजपे, मानसी परांजपे, काका मांजरेकर आदींनी उपस्थित राहून केले.

वसुंधरा दिवस वृक्षारोपण, जलसंवर्धन, पाणी बचाव आंदोलन, स्वच्छता अभियान, प्रदूषणमुक्त परिवार यासारखे कार्यक्रम आखून कृतिदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून प्रा. परांजपे, श्रीमंत कमलाबाई भोसले प्रतिष्ठान, अभिनव फाउंडेशनने खड्डे खणून आगळावेगळा कृतिदिन साजरा केला.

First Published on April 26, 2016 2:02 am

Web Title: world earth day celebration in sawantwadi
Just Now!
X