परभणी लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ११ लाख ९ हजार ८५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा मतदारसंघात यावेळी मतांचा टक्का ६१.५६ पर्यंत जाऊन पोहोचला. वाढलेले मतदान नेमके कोणाच्या फायद्याचे याबाबतचे तर्क-वितर्क आता सुरू झाले आहेत.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले असून २ लाख ११ हजार २२३(६६.६५), पाथरी २ लाख ४ हजार ८२६(६३.१८), परभणी १ लाख ७१ हजार ६७२(५९.६५), गंगाखेड २ लाख १२ हजार २६७(५९.६५), परतूर १ लाख ५१ हजार ९०२(५८.७२), घनसावंगी १ लाख ५७ हजार ९६९(५७.४३) अशी विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतांची संख्या व टक्केवारी आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या वातावरणात लोकसभेची निवडणूक पार पडली. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत परभणी लेकसभा मतदारसंघासाठी ५४ टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र मतदानाची सरासरी शेवटच्या टप्प्यात ६२ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली. सर्वाधिक मतदान जिंतूर विधानसभा मतदारसंघात झाले आहे. त्या खालोखाल परभणी विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातले दोन प्रमुख उमेदवार ज्या भागातले आहेत त्या भागात हा मतदानाचा टक्का वाढला आहे. भांबळे यांच्या जिंतूर कार्यक्षेत्रात तसेच जाधव यांच्या परभणी विधानसभा मतदारसंघात जे मतदान झाले ते आपापल्या उमेदवारांना बळ देण्यासाठी झाले असावे, असे मानण्याला जागा आहे. मतदानाचा जो टक्का वाढला आहे तो आता नेमका कोणासाठी फायद्याचा राहील याचा खल आजपासून सुरू झाला. गावोगाव वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. त्याच बरोबर आपापल्या उमेदवारांना आपापल्या गावातून किती मताधिक्य दिले गेले याचे दावेही केले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला तब्बल एक महिन्याचा अवकाश आहे. १६ मे रोजी निकाल लागेल. तोवर तरी राजकीय चर्चा सुरूच राहणार आहे. परभणीचा खासदार कोण होणार याची गणिते आजपासून बांधली जाऊ लागली आहेत. त्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय गणिते मांडली जात आहेत. झालेल्या मतदानातून जातीनिहाय टक्केवारी काढली जाईल. कोणत्या भागात कोण प्रभावी याचा प्रत्येकजण आपापल्या परीने अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतील. थोडक्यात काय तर पुढील महिनाभराचा काळ हा केवळ आकडेमोडीचाच असणार आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली असली तरीही संपूर्ण निवडणुकीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. विशेषत: जी संवेदनशील मतदान केंद्रे होती त्या ठिकाणी चोख बंदोबस्त होता. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली याचे श्रेय जिल्हा प्रशासनाला निश्चितपणे द्यायला हवे. जिंतूर तालुक्यात सत्तास्पर्धा टोकाची आहे. त्यामुळे या तालुक्यात काय घडते याकडे सर्वाचे लक्ष लागले होते, पण या तालुक्यातही अतिशय सुनियोजितपणे मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी वाढली तरी कुठेही गोंधळ अथवा गोंगाट नव्हता.