पवारांच्या भेटीत यमुनाबाईंनी लावणी जागवली

‘‘जिवलगा

तुम्ही माझे सावकार

शेत जमीन गहाण ठेवीते

घेते मी रोखा करुनी

तुम्ही माझे सावकार..’’

अशा शब्दात फड रंगवायला सुरुवात केली. लावणीच्या शब्दांमध्ये, त्याचे नखरे, रंग-ढंग साठवतच ही भेट रंगत गेली.

लावणीचा तो काळ, त्या वेळचे वातावरण, कलेची समाजाला असलेली जाण अशा आठवणी काढत लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांनी आपला काळ मंगळवारी पुन्हा जागवला. निमित्त होते शरद पवारांच्या भेटीचे. पवार वाई दौऱ्यावर आले होते. या वेळी यमुनाबाई यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीतून या कलेचेच स्मरणरंजन जागवले गेले.

दोन दिवसांपूर्वी पवार यांनी वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्याकडे यमुनाबाई यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानुसार मंगळवारी त्यांनी थेट यमुनाबाई वाईकरांचे महागणपती पूल मार्गावरचे घर गाठले. यमुनाबाईंनाही शरद पवार भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगितले होते. सकाळपासून वाट पाहत असलेल्या ९५ वर्षांच्या यमुनाबाईंनी पवारांच्या गालावरून हात फिरवत थरथरत्या हाताने त्यांचे स्वागत केले.

अतिशय साध्या घरातील हा पाहुणचार स्वीकारत पवारांनी यमुनाबाईंबरोबरच्या गप्पांना सुरुवात केली. जुना काळ, त्या काळचे कार्यक्रम, लावण्यांचा बाज अशा विविध विषयांना कवेत घेत त्यांची ही भेट रंगत गेली. या वेळी काही जुन्या छायाचित्रांचा संदर्भ घेतही आठवणी जागवल्या गेल्या. विलासराव देशमुख, माजी राज्यपाल सुब्बाराव यांच्यापासून ते प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील, मदनराव पिसाळ अशा अनेकांच्या संदर्भाना या वेळी उजाळा मिळाला.

या वेळी पवारांनीही शनिवारवाडय़ावलील त्यांच्या सत्काराची एक आठवण सांगितली. त्या वेळी त्यांना भाषण करण्याची विनंती सगळय़ांकडून करण्यात आली होती. पण ‘आपल्याला गाणं गायला येतं, भाषण नाही’ असे माझ्याकडे बघत कोपरखळी मारल्याची आठवण पवारांनी जागवली. या गप्पांनंतर पवारांनी आजही लावणी म्हणता काय, असे विचारताच यमुनाबाईंनी लगेच गायला सुरुवात केली आणि त्याच खडय़ा आवाजात.. जिवलगा तु्म्ही माझे सावकार, शेतजमीन गहाण ठेवते..ही लावणी सादर केली.