धवल कुलकर्णी

सध्या पूर्ण देश आणि महाराष्ट्रात टाळेबंदी असताना जंगलात जाऊन एका तरुणाने शिकार केली. याप्रकरणी या तरुणाला अटक करण्यात आली आहे. लीलाधर वराडकर असं या तरुणाचं नाव आहे. दोन शेकरुंची शिकार या तरुणाने केली. त्याने शिकार करुन सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शिकारीसह पोस्ट केले. त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला.

मौजे कुणकेरी तालुका सावंतवाडी येथील लीलाधर मीनानाथ वराडकर (वय २५) याने शुक्रवारी दोन शेकरूंची शिकार करून शिकारी सोबतचे स्वतःचे फोटो सोशल मीडियावर टाकले केले होते. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे आणि वनसंरक्षण कायद्यानुसार त्याला संरक्षण प्राप्त आहे.

वी क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर वनवृत्त, यांनी सांगितले की वराडकर याने शिकार करून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे हा प्रकार वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आला. आरोपी हे भारतीय लष्करामध्ये कार्यरत असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

हा प्रकार लक्षात येताच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने शिकार केल्याचे मान्य केले. यानुसार सावंतवाडीचे उपवन संरक्षक समाधान चव्हाण व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत वराडकर यांना अटक केली आणि आणि शनिवारी त्याला सावंतवाडी येथे न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची वन कोठडी सुनावली. पुढील तपास वनक्षेत्रपाल ग मा पानपट्टे हे करत आहेत.