कायम चर्चेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बिचुकले यांनी मुंबईकडे आपला मोर्चा वळवला असून यावेळी त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अभिजित बिचुकले यांनी वरळीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून यावेळी ते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज (शुक्रवार) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनंतर “288 जागा लढवण्यासाठी सध्यातरी माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मात्र दोन्ही राजे जे टोलनाका, दारुचे दुकान, कार्यकर्ते या क्षुल्लक गोष्टींसाठी भांडत असतात, त्यामुळे यंदा सातारकरांनी नीट विचार करावा. या दोन्ही राजांना राजे राहू द्या आणि तुमच्या अभिजित बिचुकलेला विधानसभा आणि लोकसभेसाठी पाठवा,” असं ते म्हणाले होते.

आणखी वाचा : आदित्यसाठी आधी पुनर्वसन कोणाचे?

यावेळी आदित्य ठाकरे वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ते पहिलेच ठाकरे आहेत. काल आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आघाडी आणि मित्रपक्षांनीही अॅड. सुरेश माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.