पश्चिम भागात बंडखोरीचे निशाण

तिकीट वाटपानंतर फडकलेले बंडाचे निशाण आणि जागा वाटपातील घोळ अशा राजकीय पटलावरील मतभेदांचे प्रतिबिंब अर्ज दाखल करताना उमटले. नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीतर्फे देवयानी फरांदे, तर नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांनी अर्ज दाखल केले. यावेळी सेनेचे खासदार हेमंत गोडसे वगळता अन्य पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. नाशिक मध्यच्या तिकिटावरून धुसफुस असल्याने भाजपचे अनेक पदाधिकारीही अनुपस्थित होते. नाशिक पश्चिममध्ये सेना नगरसेवकांच्या गटाने बंडखोरीचे निशाण फडकविले आहे.

नाशिक मध्यमधून फरांदे तर पश्चिममधून हिरे यांनी अर्ज दाखल केले. यावेळी महापौर रंजना भानसी, प्रदेश पदाधिकारी सुनील बागूल, विजय साने या भाजप नेत्यांसह सेनेचे खासदार गोडसे उपस्थित होते. भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे तसेच अन्य पदाधिकारी नव्हते. नाशिक मध्यची उमेदवारी न मिळाल्याने बंडाच्या पवित्र्यात असणाऱ्या वसंत गीते गटाने अनुपस्थित राहून नाराजी प्रगट केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत काढल्याचे सांगितले जाते. यामुळे त्यांनी आघाडीची उमेदवारी घेणे टाळले. नाशिक पश्चिममध्ये त्यापेक्षा वेगळी स्थिती आहे. पक्षांतर्गत आणि सेनेची बंडखोरी भाजपची डोकेदुखी ठरली. ही जागा सेनेला न दिल्याने नगरसेवकांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. गटनेते विलास शिंदे शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. याव्यतिरिक्त भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील हेदेखील मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामुळे खासदार वगळता सेनेचे पदाधिकारी भाजपसोबत दिसले नाहीत.  यासंदर्भात फरांदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पक्षात कुठेही नाराजी नसल्याचा दावा केला. सर्वत्र अर्ज भरण्याची धावपळ असल्याने नेते त्यात अडकले आहेत. वरिष्ठ नेत्यांनी सर्वाशी चर्चा केलेली आहे. गीते यांची नाराजी दूर होईल, असे त्यांनी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजपने शहरात दोन्ही महिलांना प्राधान्यक्रमाने पुन्हा संधी दिली असल्याकडे हिरे यांनी लक्ष वेधले.

इगतपुरीत आलबेल असल्याचा दावा

इगतपुरी मतदारसंघात सेना-भाजप महायुतीकडून निर्मला गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काही स्थानिक पदाधिकारी अनुपस्थित होते, परंतु खा. हेमंत गोडसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नसल्याचे गावित यांनी सांगितले. निवडणुकीत आव्हान आहेच, पण ते पेलण्याची ताकद आमच्यात आहे. विरोधी पक्षातील आमदार म्हणून काम करताना अपेक्षित विकास साधता येत नाही. मतदारसंघाला न्याय देण्यासाठी पक्षांतर केल्याचे गावित यांनी सांगितले.

बंडखोरांची मनधरणी करणार

भाजपचे स्थानिक पदाधिकारी बंडखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्यांची मनधरणी करणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल यांनी सांगितले. सेनेचे वरिष्ठ नेते त्यांच्या नगरसेवकांना आदेश देतील.  ज्यांनी विरोधात अर्ज दाखल केले, त्यांची समजून काढली जाईल.   सर्व पदाधिकारी एकदिलाने भाजपच्या उमेदवारांसाठी काम करतील, असा दावा त्यांनी केला.