भाजपाच्या रम्या निवडणूक जवळ येईल तसा फॉर्मात येताना दिसतो आहे. आज त्याने तेलगी प्रकरण उकरुन काढत शरद पवार आणि त्यावेळच्या सरकारमधील मंत्र्यांना डोस दिले आहेत. अब्दुल करीम तेलगीने बनावट मुद्रांक प्रकरणात हजारो कोटींचा घोटाळा केला. त्यावेळी हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. आता त्यावरुनच भाजपाच्या रम्याने शरद पवार आणि त्यावेळच्या सरकारमधील मंत्र्यांना डोस दिले आहेत.

रम्याला एक पत्रकार भेटतात असे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. ते सांगतात मला आजही आठवतेय माझी तेलगी प्रकरणावरची लेखमालिका. कागदोपत्री तो २० हजार कोटींचा घोटाळा होता. पण प्रत्यक्षात तो किती मोठा होता ह्याची कल्पनाही करवत नाही. कदाचित आजवरचा सर्वात मोठा घोटाळा असू शकतो. त्यावर रम्या म्हणतो नक्कीच.. खूप मोठी साखळी होती ती. पण तेलगीने चौकशीत त्यावेळच्या सरकारमधील ज्यांची नावं घेतली ते तर तेल, घी लावलेल्या पैलवानासारखे निसटले.

शरद पवार यांना महाराष्ट्रातल्या राजकारणातला तेल लावलेला पैलवान असं संबोधलं जातं कारण कुठल्याही प्रकरणात ते अडकत नाहीत निसटून जातात. तेलगीच्या मुद्रांक घोटाळा प्रकरणातही त्यांचं नाव समोर येईल असं वाटत होतं. मात्र तसं घडलं नाही. त्यामुळेच या प्रकरणावरुन भाजपाच्या रम्याने शरद पवार आणि इतर नेत्यांना टोला लगावला आहे आणि डोसही दिले आहेत.