विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १८ दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यपालांनी भाजपाला सत्तेस्थापनेसाठी शनिवारी आमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळेच आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापनेच्या हलचाली सुरु केल्या आहेत. मात्र शिवसेनेने भाजपाबरोबर युती करुन अशाप्रकारे आघाडीच्या सोबतीने सरकार स्थापन करणे नैतिकतेला धरुन नसल्याची टीका भाजपाच्या समर्थकांकडून केली जात आहे. असं असतानाच आता काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी ट्विटवरुन भाजपाने कोणकोणत्या राज्यांमध्ये अशाप्रकारे बहुमत नसताना विरोधकांबरोबर युती करुन सत्ता स्थापन केली आहे यासंदर्भातील आकडेवारी देत टीका केली आहे.

“विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेला जनादेश हा भाजपा-शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम अशा सर्व घटक पक्षांना होता. तथापि सरकार बनविण्यासाठी शिवसेना राजी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!,” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करत भाजपा सत्ता स्थापन करणार नाही असं सांगितलं. त्यानंतर राज्यामध्ये दोन्ही काँग्रेसला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने हलचाली सुरु केल्या आहेत. यावरुन भाजपाचा समर्थकांनी टीकेची झोड उठवत दोन्ही काँग्रेसला बरोबर घेऊन शिवसेनेने सत्ता स्थापन करणे नैतिकतेला धरुन नसल्याचं म्हटलं आहे. सोशल मिडियावर यासंदर्भात अनेक हॅशटॅग ट्रेण्ड करुन शिवसेनेवर टीका केली जात आहे.

मात्र यावर आता काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी टीका केली आहे. “भाजपाला नैतिकता आजच आठवली का?,” असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला आहे. “गोव्यामध्ये काँग्रेसला १७ जागा भाजपाला १३, मणिपूरमध्ये काँग्रेसला २८ जागा भाजपाला २१ जागा, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलला ८० तर जनता दल युनायटेडला ७१ आणि भाजपाला ५३ जागा, मेघालयमध्ये भाजपाला केवळ दोन तर काँग्रेसला २१ आणि नॅशनल पीपल्स पार्टीला १९ जागा होत्या,” अशी आठवण जगताप यांनी ट्विटमधून भाजपाला करुन दिली आहे. जनमताचा कौल भाजपाच्या बाजूने नसताना “भाजपाने या राज्यात सरकारे बनवताना नैतिकता गुंडाळून ठेवली होती का?,” असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला आहे. तसेच “जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींबरोबर युती करताना लाज भाजून खाल्ली होती की तळून?,” असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अशापद्धतीने वैचारिक मतभेद असताना शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्यास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळेच आता राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार की राष्ट्रपती राजवट लागू होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले आहे.