राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार ही केवळ एक कल्पना आहे. जर आपल्याला ही कल्पना सत्यात उतरवायची असेल तर शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही आणि जर आपण शिवसेनेचा पाठिंबा घेतला, तर काँग्रेससाठी हे घातक ठरेल, असे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

निरुपम यांनी काँग्रेस-शिवसेनेमधील संभाव्य मैत्रीला कडाडून विरोध दर्शवला आहे. ‘शिवसेनेच्या सोबत जाणं ही काँग्रेससाठी आपत्तीच ठरेल,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या राजकीय परिस्थितीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार स्थापनं कठीण आहे. कारण, आमच्याकडे तेवढे आकडे नाहीत. बहुमताचा आकडा गाठायचा असेल, तर आम्हाला शिवसेनेची गरज लागेल. मात्र, शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा विचार कोणत्याही परिस्थिती केला जाऊ नये. तसा काही निर्णय झालाच तर तो पक्षासाठी घातक ठरेल,’ असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली असल्याची माहिती समोर आली आहे. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा द्यावा असं बैठकीत सांगितलं असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सरकार सत्तास्थापन करण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. सत्तास्थापनेसाठी भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी नकार दर्शवला आहे. तर,काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता दर्शवली जात आहे.