शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडी गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून उठलेले आरोपप्रत्यारोपाचे वादळ अद्यापही शमलेले दिसत नाही. शरद पवार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसेचे नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाना साधला आहे. “ED, CBI, Income Tax ची कार्यालये एवढी दूर का? भाजपाच्या कार्यालयातच यांच्या शाखा सुरू करा, राज्यकर्त्यांची काळजी वाटते म्हणून हा सल्ला!,” असा सल्ला सावंत यांनी दिला.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी  शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर 24 सप्टेंबर रोजी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह सर्वांनीच यावर आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच अनेकांनी सरकार राजकीय सूडबुद्धीने सीबीआय, ईडीसह स्वायत्त संस्थांचा वापर विरोधकांविरोधात करत आहे, असा आरोपही भाजपावर होत आहे.

दरम्यान, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही टीका केली आहे. सावंत म्हणाले, “सरकारने तातडीने नवीन जेल बनवायला सुरुवात करावी. पुढे विरोधकांकरीता जेलमध्ये जागा कमी पडायला नको. उगीचच सरकारला आयत्या वेळी डोकेदुखी, नाही का?. ED, CBI, Income Tax ची कार्यालये एवढी दूर का? भाजपाच्या कार्यालयातच यांच्या शाखा सुरू करा राज्यकर्त्यांची काळजी वाटते म्हणून हा सल्ला!,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.