एकूण २८ पैकी १३ जणांनी माघार घेतल्याने नांदगाव विधानसभा मतदारसंघात आता पाच पक्षांचे तर १० अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि अर्थ सभापती मनीषा पवार यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केली आहे. तसेच भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप यांनीही बंडखोरी केली आहे. बंडखोर रिंगणात असले तरी मुख्य लढत महायुतीचे सुहास कांदे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पंकज भुजबळ यांच्यातच आहे.

भुजबळांविरोधात कांदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी केली होती. परंतु त्यांना थोडक्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्यांच्यातच पुन्हा मुख्य लढत होत आहे. माजी आमदार संजय पवार यांनीही अर्ज दाखल केला होता. स्थानिक नेतृत्वाला न्याय देण्यासाठी आपली उमेदवारी होती. परंतु सर्वाशी चर्चा केल्यानंतर या चर्चेत स्थानिक नेतृत्वाबाबत एकमत न झाल्याने आपण माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या इतर काही उमेदवारांमध्ये गोविंद बोराळे (बसपा), राजेंद्र पगारे (वंचित बहुजन आघाडी), विशाल वडघुले (आम आदमी पार्टी) यांचा समावेश आहे.