हिंदुत्वाच्या आधारावर झालेली शिवसेना-भाजपाची आजवरची सर्वात मोठी युती आहे. त्यामुळे ही युती आबाधित रहायला हवी अजूनही वेळ गेलेली नाही, असे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरी म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होईल. त्यानुसार आता महाराष्ट्रात सर्वाधिक १०५ आमदार भाजपाचे आहेत. ज्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी युतीचं राजकारण केलं. आजही आमची युती त्याच आधारावर टिकून आहे त्यामुळे शिवसेना युती तोडण्याच काम करणार नाही. मात्र, शेवटी त्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे त्यामुळे त्यांना कोणासोबत जायचे हा त्यांचा निर्णय आहे.”

शिवसेनेच्या मंत्रीपदाबाबत किंवा वाट्याबाबत चर्चा करता आली असती. मात्र, निकालानंतर आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत असं म्हणणं म्हणजे युतीला काही अर्थ नाही. शिवसेनेच्या दाव्यानुसार, आम्ही पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यावर त्यांनी आम्हाला सांगितले की, लोकसभेच्या वेळी अशा प्रकारचा विषय शिवसेनेने आमच्यासमोर ठेवला होता. मात्र, विधानसभेच्यावेळी याबाबत चर्चा करु असे आम्ही त्यांना सांगितले. याबाबत शिवसेनेला आम्ही कुठलेही वचन दिले नव्हते, असे शहा यांनी सांगितल्याचे गडकरींनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

मला विश्वास आहे भाजपा सेनेचं सरकार स्थापन होईल, गरज पडल्यास मी यामध्ये मध्यस्थी करेन. हिंदुत्वाच्या आधारावर असलेली ही युती अबाधित रहायला हवी, अशी इच्छाही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.