शिवसेनेच्या मुखपत्रातून आर्थिक मंदीवरुन सरकारवर टीका करण्यात आली आहे. मात्र, हेच जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतःच्या तोंडून बोलले असते तर ती चिंतेची बाब होती, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. महायुतीमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी अग्रलेखातून केलेल्या या टीकेवर त्यांनी आपली भूमिका मांडली. कोथरुडच्या संकल्पपत्राच्या प्रकाशनादरम्यान ते बोलत होते.

पाटील म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पूर्वी कोल्हापूरच्या सभेत सांगितले होते की, मागील पाच वर्षांत सरकारने जेव्हा जेव्हा चुकीची कामं केली तेव्हा तेव्हा मी टीका करण्याचे काम केले. पण कधीही सरकारला अडचणीत आणले नाही. आता पुढील पाच वर्षे देखील सरकारचा कारभार चुकीचा वाटल्यास मी त्याविरोधात माझी भूमिका मांडणार आहे. त्यामुळे वृत्तपत्रातून आपली भुमिका मांडण्यापेक्षा त्यांनी स्वतः आर्थिक मंदीबाबत भुमिका मांडली असती तर ती चिंतेची बाब होती.

माझ्या उमेदवारीची घोषणा झाल्यापासून आज अखेर टीका करण्याचे काम विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, गेल्या १२ वर्षात पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून कोल्हापूरमध्ये दहाही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. या कामाच्या जोरावर मी १० पैकी कोणत्याही एका मतदार संघातून जरी उभा राहिलो असतो तरी प्रचंड मतांनी निवडून आलो असतो असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यात शिवसेना आणि भाजपाकडून ज्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. त्या सर्वांवर दोन्ही पक्षांच्या प्रमुखाकडून कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संकल्प पत्रातील ठळक मुद्दे….

  • कोल्हापुरप्रमाणे कोथरूड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष काम करणार
  • पुण्याला जास्त पाणी मिळावे यासाठी राज्य सरकार बरोबर चर्चा केली जाईल
  • मेट्रोच्या कामाला गती देणे आवश्यक असून त्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील
  • ई-व्हेईकलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न
  • संस्कृती विद्यापीठ उभारणार
  • नृत्य अकादमी आणि प्रायोगिक रंगभूमीसाठी विशेष नाट्यगृह उभारणार
  • हास्य भवन उभारणार
  • गदिमा भवन उभारणार
  • कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करणार
  • सहा मीटर रस्त्यावरील इमारतींचा पुनर्विकास करणार