18 October 2019

News Flash

भाजप-शिवसेनेचे स्वतंत्र जाहीरनामे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली

शिवसेनेकडून घोषणांची सुरुवात

उमाकांत देशपांडे, मुंबई

भाजप-शिवसेना युती झाली असली तरी सत्ता आल्यावर कोणत्या योजना, प्रकल्प हाती घ्यायचे आणि जाहीरनाम्यांद्वारे कोणत्या कामांचा संकल्प करायचा, याबाबत मतैक्य होऊ न शकल्याने उभय पक्षांचे स्वतंत्र जाहीरनामे जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यापासूनच घोषणांची सुरुवात केली असून किमान समान कार्यक्रम जाहीर करण्याबाबतही दोन्ही पक्षांनी अद्याप निर्णय घेतला नसल्याचे उच्चपदस्थ नेत्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही पक्षांकडून जाहीरनामा तयार केला असून शिवसेनेने आपला मसुदा भाजप नेत्यांकडे पाठविला होता. मात्र त्यातील अनेक मुद्दे भाजपला अमान्य असल्याने संयुक्त जाहीरनामा अद्याप तयार होऊ शकलेला नाही. त्यामुळे ठाकरे यांनी दसरा मेळावा आणि प्रचारसभांमधूनच शिवसेनेच्या घोषणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात झाली आहे. सत्तेत आल्यावर १० रुपयांमध्ये सकस आहार असलेली थाळी, ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज, शेतकऱ्यांना दरवर्षी १० हजार रुपयांची आर्थिक मदत याबरोबरच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, असेही ठाकरे यांनी घोषित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. ती अपुरी असल्याची आणि त्रुटींमुळे बरेच शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याची भूमिका शिवसेनेने घेतली. शेतकरी कर्जमुक्त होतील, अशी पावले उचलण्याचे शिवसेनेचे आश्वासन आहे.

आता निवडणुकीत शेतकऱ्यांना आणखी कर्जमाफी जाहीर करून सरकारला आर्थिक भार पेलता येईल का, हा प्रश्न आहे. ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे वीजदर कमी करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे. पण त्यासाठीचा हजारो कोटी रुपयांचा आर्थिक भार सरकारला पेलता येणार नाही. मुंबईत वेगवेगळ्या वीजकंपन्या असताना घरगुती ग्राहकांना समान वीजदराचा प्रश्नही गेली अनेक वर्षे सोडविता आलेला नाही. तर राज्यातील ग्राहकांचे वीजदर कमी करता येणे शक्य होणार नाही.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान योजना सुरू केली आहे. त्या धर्तीवर आणखी १० हजार रुपये देण्याचे शिवसेनेने घोषित केले आहे. निवडणुकीत केलेल्या घोषणांचा आर्थिक भार किती येईल व त्या पूर्ण करता येतील का, हा प्रश्न असल्याने भाजपची त्यास सहमती नाही. नाणार, आरे कॉलनी अशा प्रकल्पांबाबतही वाद असून या मुद्दय़ांचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात येणार नाही.

First Published on October 10, 2019 2:25 am

Web Title: independent manifesto of bjp shiv sena zws 70