खारघरमधील भाषणात विकासावर भर

काश्मीरला विशेषाधिकार देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० मधील तरतुदी रद्द  केल्याचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मागे पडला आहे. त्याऐवजी विकासकामांवर भर दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी खारघर येथे मोठय़ा जनसमुदायासमोर केलेल्या पंचवीस मिनिटाच्या भाषणात याचा प्रत्यय आला. मोदी यांनी राज्य व कोकण विकासावर भर दिला होता.

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भूमीत एक वर्षांत दोन वेळा येण्याची संधी मिळाल्याने प्रेरणा मिळत असल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी कोकणस्थ आणि शिवभक्तांना खूश करून टाकले.

दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र सत्तेत राहिल्यास विकासाचे डबल इंजिन तयार होत असून ११ पट शक्ती निर्माण होत आहे, असे सांगून राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब तर केलेच याशिवाय दोन्ही ठिकाणी एकच सरकार असल्यास राज्याचा विकास झपाटय़ाने होत असल्याचे त्यांनी अधोरिखित केले.

कोकण भूमी ही आर्थिक विकासाचे नवीन केंद्र असल्याचे सांगताना या ठिकाणी सागरमाला योजनेअंर्तगत कोटय़वधी खर्चाची कामे होत असल्याचे स्पष्ट केल्याने पनवेलपासून सिंधुदुर्गपर्यंत होणाऱ्या विकासाचे चित्र स्पष्ट झाले.

पंतप्रधानांनी या देशाची ब्लू इकॉनॉमी अर्थात समुद्री संपन्नता स्पष्ट केल्याने ७२० किलोमीटर लांब असलेल्या कोकणच्या भविष्याची दिशा दिसून आली. या सर्व भाषणात पंतप्रधानांनी राज्य व कोकणचा विकास यावर भर दिला.

काश्मीर ३७०, आयुष्मान व गॅस योजनेवर भर देण्याची प्रचार रचना पनवेलमधील पक्षाच्या कार्यकारिणीत करण्यात आली होती, पण पंतप्रधानांनी त्याच पनवेलमध्ये येऊन या तीन योजनेतील एकाही योजनेचा उल्लेख न करता विकासावर भाषणाचा भर दिल्याचे दिसून आले.