स्नुषा भाजपच्या महापौर, सासू राष्ट्रवादीची उमेदवार

उल्हासनगर : भाजपने कुमार आयलानी यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या कलानी कुटुंबीयांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधला असून गुरुवारी दुपारी ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केला.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपशी जवळीक साधून शहराचे महापौरपद मिळविणाऱ्या कलानी कुटुंबाला धक्का देत भाजपने  आयलानी यांना उल्हासनगरातून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपची उमेदवारी मिळेल या आशेवर असलेल्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील स्थानिक नेत्यांना धक्का देण्यासाठी भाजपने पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी यांना पक्षात प्रवेश दिला होता.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही ज्योती कलानी यांनी भाजपचे तत्कालीन आमदार कुमार आयलानी यांचा पाच हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. मात्र बदलते वारे लक्षात घेऊन ओमी यांनी भाजपची वाट धरली. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेला धक्का देण्यासाठी ओमी यांना पक्षात आणले आणि उल्हासनगर महापालिकेवर सत्ताही स्थापन केली.

उल्हासनगर पालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीत बहुतांश ओमी कलानी समर्थकांना भाजपने उमेदवारी देऊन निवडून आणले होते. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपचे महापौर पालिकेत विराजमान झाले. त्याचे श्रेय ओमी कलानी गटाचे असून त्यामुळे ओमी यांच्या पत्नी पंचम कलानी यांना भाजपने महापौरपद दिले. म्हणूनच भाजपमधून कलानी कुटुंबाला संधी मिळाल्यास पंचम कलानीच भाजपच्या उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

भरत गंगोत्री यांचाही दावा उल्हासनगर महापालिकेत ओमी यांच्या पत्नी पंचम या भाजपच्या महापौर आहेत. मात्र कुमार आयलानी यांना भाजपने उमेदवारी दिल्याने पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती यांनी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे स्नुषा भाजपच्या महापौर आणि सासू राष्ट्रवादीच्या उमेदवार अशी परिस्थिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने सुरुवातीला उमेदवारी जाहीर केलेले शहराध्यक्ष भरत गंगोत्री यांनीही आपणच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केल्याने संभ्रमात भर पडली आहे.